सर्वोत्कृष्ट चित्रपट व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांना पुरस्काराचे वितरण
बुलढाणा फिल्म सोसायटी व वाडेकर फिल्म्सचा उपक्रम

बुलढाणा, (प्रतिनिधी) : मागील ३५ वर्षांपासून चित्रपटाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्थानिक बुलढाणा फिल्म सोसायटी व वाडेकर फिल्म्सने आयोजित केलेल्या राष्ट्रीय चित्रपट उत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
स्थानिक पत्रकार भवनात २२ फेब्रुवारी रोजी आयोजित पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी सिने व नाट्य कलावंत सुभाष बावस्कर हे होते. प्रसिद्ध सिने अभिनेते मोहन काळे यांच्यासह चित्रपट कलावंत रफिक कुरेशी नाट्य दिग्दर्शक गणेश बंगाळे, नाट्य कलावंत गणेश तांगडे, वाडेकर फिल्मसचे प्रमुख भास्कर वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. भास्कर वाडेकर , सुरज वाडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बुलढाणा फिल्म सोसायटीच्यावतीने मागील ३५ वर्षांपासून चित्रपट निर्मिती व चित्रपटासंबंधीचे कार्य सुरु आहे. त्यामध्ये मागील १८ वर्षापासून उत्कृष्ट चित्रपट व राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार वितरण हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाच्या चित्रपट महोत्सवात राज्याच्या विविध भागातून चित्रपट निर्मात्यांनी सहभाग नोंदवला. त्यातील विविध श्रेणीतील सर्वोत्कृष्ट ठरलेल्या २० चित्रकृतींना पुरस्कार देण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २० व्यक्तींचाही राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच “अवर एन्व्हार्यमेंट” या लघुपटाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या शंभर पुरस्कारांबद्दल दिग्दर्शक सुरज वाडेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
पुरस्कार वितरण समारंभात सामाजिक कार्यकर्त्या व नाट्यकलावंत सुरेखा खोत यांनी एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरज वाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन नाट्य कलावंत शशिकांत इंगळे यांनी केले तर भास्कर वाडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयूर कंकाळ, सौरभ आवटे, संतोष शिंगणे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सिने व नाट्य कलावंत बहुसंख्येने उपस्थित होते.



