अहिल्यानगर

काळाची झडप: नगर-दौंड महामार्ग अपघातात चौघे ठार

पातूरच्या मळसूर येथील पायघन कुटुंबातील तिघांचा मृत्यू; १३ वर्षीय चिमुकल्याची मृत्यूशी झुंज

अकोला,(प्रतिनिधी): श्रीगोंदा-नगर दौंड महामार्गावर श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारात मंगळवारी (दि. २४) पहाटे झालेल्या मालट्रक आणि मारुती इको कारच्या भीषण अपघातात चौघे ठार झाले आहेत. ही घटना पहाटे ३ वाजताच्या सुमारास कोळगाव शिवारातील माऊली मंदिराजवळ घडली.

या अपघातात अकोल्याच्या पातूर तालुक्यातील मळसूर येथील पायघन या एकाच कुटुंबातील तिघे ठार झाले आहेत. त्यात गजानन जनार्धन पायघन (वय ४७), दुर्गा गजानन पायघन (वय ३६) आणि वैभव गजानन पायघन (वय १९) या आई-वडील व मुलाचा दुर्दैवी अंत झाला. तर इको गाडीचा चालक नितीन अनिल कोकाटे (वय २२, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) याचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये १३ वर्षीय मुलगा करण गजानन पायघन गंभीर जखमी असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. मळसूरच्या पायघन कुटुंबातील तिघांचा अकाली अपघाती मृत्यू झाल्याने अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

ट्रक आणि इको कार यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. दौंडकडून नगरकडे येणारा मालट्रक आणि नगरकडून दौंडच्या दिशेने जाणारी मारुती इको गाडी यांच्यात हा अपघात घडला. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, इको गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात करण गजानन पायघन (वय १३) हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पायघन कुटुंब मूळचे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळसूर येथील रहिवासी असून कामानिमित्त सध्या श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथे वास्तव्यास होते. काष्टी येथील चालक नितीन कोकाटे यांना घेऊन ते गावी गेले होते. गावांहून चिंभळेकडे परत येत असताना हा भीषण अपघात झाला.

पहाटेची वेळ, विरळ वाहतूक आणि संभाव्य वेग यामुळे हा अपघात अधिक भीषण ठरल्याची चर्चा परिसरात आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बेलवंडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा व पुढील कार्यवाही करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे नगर-दौंड मार्गावरील वाढत्या अपघातांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावर वेग नियंत्रण फलक, प्रकाश व्यवस्था याबाबत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

पायघन कुटुंबावर दु:खाचा डोंगर

पातूर तालुक्यातील मळसूर येथील पायघन कुटुंब मजुरी करण्यानिमित्त ते श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथे वास्तव्यास होते. या अपघातामुळे पायघन कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. रुग्णवाहिकेने तिघांचे मृतदेह अकोल्याकडे नेण्यात आले.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!