राजकारण
दोषींवर कार्यवाही करा; राजकीय व जातीय रंग देऊ नका : आ. सिद्धार्थ खरात
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा इतरत्र हलवू नका

दोषींवर कार्यवाही करा; राजकीय व जातीय रंग देऊ नका : आ. सिद्धार्थ खरात
मेहकर,(प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा इतरत्र हलवू नका, यावर ठाम भूमिका घेणाऱ्या चिखला येथील आमच्या भगिनी शिवसेनेच्या कार्यकर्त्या संजीवनी वाघ यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर गावातील काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी व महिलांनी हल्ला केला. तिला बेदम मारहाण केली. त्या सर्व आरोपींवर कडक कारवाई करा, कायदेशीर गुन्हे नोंदवून त्यांना अटक करा, अशी मागणी करत या घटनेला राजकीय रंग देऊ नका, असे आवाहन मेहकर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले.
चिखला येथे घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. या घटनेत दोषी असलेल्या प्रत्येकावर कारवाई होणे आवश्यक आहे. जोपर्यंत सर्व दोषींना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा सर्वात अगोदर शिवसेना (उबाठा) ने घेतला होता. त्यानंतर रात्री पोलिसांनी काही लोकांना अटक केली. आजपर्यंत जवळपास ३६ लोकांना अटक करण्यात आली असून अजूनही काही दोषींना अटक केलेली नाही, त्यांना अटक करावे, अशी आमची मागणी पहिल्यापासून असल्याचे सांगत या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देत जातीय द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. आधीच गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या घटनेसंदर्भात दोषी नसणारे लोकही यात भरडल्या जात आहेत. म्हणून बाहेरून आलेल्या लोकांनी या प्रकरणात जातीय व राजकीय रंग आणू नये, असे आवाहन आ. सिद्धार्थ खरात यांनी यावेळी केले. संजीवनी वाघ यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आपण विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे आ. सिद्धार्थ खरात यांनी या वेळी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, पोलिसांनी दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.
या वेळी मेहकर नगराध्यक्ष किशोर गारोळे, शिवसेना उपाध्यक्ष प्रा. आशिष रहाटे, मेहकर तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, शिवसेना नेते दिलीप वाघ, युवा सेना तालुकाप्रमुख ॲड. आकाश घोडे, उकळी सर्कलप्रमुख अमोल बोरे, अशोक तुपकर, प्राचार्य विश्वनाथ बाहेकर, दिनकर शिंदे, गजानन आरे, परमेश्वर दहातोंडे, जीवन घायाळ यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंनी दिला धीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष दूरध्वनीद्वारे संपर्क करून संजीवनी वाघ यांची विचारपूस केली. संपुर्ण माहिती घेतली आणि एक भाऊ म्हणून आम्ही सोबत आहोत, शिवसेना पक्ष कायम आपल्या सोबत आहे, असा विश्वास आणि आधार दिला.



