धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ?
छत्रपती संभाजीनगर खंडपीठात सुनावणी; ६ मार्चची तारीख महत्त्वाची

छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी): परळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ६ मार्च रोजी होणार असून, याचिकाकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत विजयाला आव्हान दिले आहे.
याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ही कायदेशीर लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. निवडणूक अर्जाच्या छाननीवेळी धनंजय मुंडे यांचा अर्ज अवैध होता, असा दावा करण्यात आला आहे. त्यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही तो अर्ज स्वीकारला गेल्याचा आरोप याचिकेत आहे. अर्जावरील सूचकाची स्वाक्षरी खरी की खोटी?, याची तपासणी करण्याचे अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे होते. मात्र, तिथे कर्तव्यात कसूर झाल्याचा दावा करण्यात आला आहे. “जर २० हजार रुपयांसाठी एखादा तहसीलदार जेलमध्ये जाऊ शकतो, तर माझ्या अर्जाच्या वेळी मुंडेंनी कोणाला किती पैसे दिले, हे देखील कोर्टात लोकांसमोर येईल,” असा खळबळजनक आरोप याचिकाकर्त्यांनी अर्थात करुणा मुंडे यांनी केला आहे.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर वकिलांना झालेली मारहाण आणि तेथील गैरप्रकार यावरही कोर्टात पुरावे सादर करण्यात आले असून आमची अर्धी केस पूर्ण झाली असून परळी आणि हाय कोर्ट, अशा दोन्ही ठिकाणी आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून लढा देत आहोत. धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होण्याची स्वप्ने पाहत असले, तरी औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या या प्रकरणाचा निकाल त्यांच्या विरोधात जाईल आणि आम्हाला १०० टक्के न्याय मिळेल याची आम्हाला खात्री असल्याचे करुणा मुंडे माध्यमांशी बोलतांना सांगितले. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे लक्ष ६ मार्च रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे लागले आहे.
