क्राईम जगत
बुलढाण्यात खळबळ: शिक्षक पतीचे ‘त्या’ महिलेशी अनैतिक संबंध
पत्नीला अमानुष छळल्याप्रकरणी कुटुंबासह ६ जणांवर गुन्हा दाखल!

बुलढाणा,(प्रतिनिधी) : शेगाव येथील एका नामांकित महाविद्यालयाजवळ राहणाऱ्या शिक्षक पतीने आपल्या नातेवाइकांच्या मदतीने पत्नीला हुंड्यासाठी आणि स्वतःच्या अनैतिक संबंधाला विरोध केल्यामुळे तब्बल १४ वर्षे शारीरिक व मानसिक त्रास दिला. भारतीय संस्कृती आणि अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या आणि ज्ञानार्जन करणाऱ्या एका शिक्षकानेच आपल्या पत्नीचा छळ करून माणुसकीला काळिमा फासल्याची ही धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी पतीसह सासू आणि इतर नातेवाइकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.
बुलढाणा शहरातील चैतन्य वाडी परिसरात राहणाऱ्या सुनीता भगवान सपकाळ (वय ३८ वर्षे) यांचा विवाह २० मे २०११ रोजी भगवान साळूबा सपकाळ (रा.पवारवाडी, शेगाव) यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ सुखाने संसार केला. मात्र, कालांतराने आरोपी पती भगवान सपकाळ याने आपल्या मूळ स्वभावानुसार सुनीता यांना हुंड्यासाठी तगादा लावून त्रास देण्यास सुरुवात केली. या काळात त्यांना प्रज्वल आणि रेयांश ही दोन मुलेही झाली. आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून सुनीताने निमूटपणे सर्व छळ सहन केला. मात्र, आरोपी भगवान सपकाळ याचे अटाळी (ता.खामगाव) येथील महिलेशी अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधांना पत्नी सुनीता यांनी वारंवार विरोध केला. त्यामुळे पती भगवान याने त्यांना बेदम मारहाण करायला लागला. सोबतच मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी गेला. त्यामुळे दारू पिऊन घरी येणे आणि किरकोळ कारणावरून सुनीता यांना शारीरिक व मानसिक यातना देण्याचा त्याचा नित्यक्रम झाला होता. विशेष म्हणजे सासू गयाबाई साळूबा सपकाळ, भाऊ दिलीप सपकाळ, वहिनी मनीषा सपकाळ आणि रामदास सपकाळ यांनीही पतीला साथ दिली. घरातील इतर सदस्यांनी सुनीता यांना आधार देण्याऐवजी उलट त्यांनाच मानसिक कोंडीत पकडले होते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या छळाची सीमा ७ ऑक्टोबर २०२५ रोजी ओलांडल्याने सुनीता यांनी आपले सासर सोडून बुलढाणा येथील माहेरी आश्रय घेतला.
याप्रकरणी सुनीता सपकाळ यांनी बुलढाणा शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भगवान साळूबा सपकाळ (पती – शिक्षक), गयाबाई साळूबा सपकाळ (सासू), दिलीप साळुबा सपकाळ (दीर), मनीषा दिलीप सपकाळ (जाऊ), रामदास साळूबा सपकाळ यांच्यासह अनैतिक सबंध असलेल्या “त्या” महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ११५ (२), ३५२, ३५१(२)(३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव खवले हे करीत आहेत.



