
बुलढाणा,(प्रतनिधी): वीज बिलाच्या वसूलीवरच महावितरणचे अस्तित्व अवलंबून आहे. त्यामुळे वीज बिलाची थकबाकी शुन्य करण्यासाठी महावितरण अकोला परिमंडळात वीज बिल वसूली मोहिम तीव्र करण्यात आली असून प्रतिसाद मिळत नसलेल्या भागात सामुहिक मोहिम राबविण्यात येत आहे. या कारवाईत वीज ग्राहकांचे थेट मीटर काढून आणण्यात येत आहे. त्यामुळे वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्या उपस्थितीत आणि कार्यकारी अभियंता अनिरूध्द आलेगावक यांच्या पुढाकाराने मेहकर विभागातील शेलगावात सामुहिक कारवाई करण्यात आली. थकबाकीदार ३८ वीज ग्राहकांचे थेट मीटर काढण्यात आले. शिवाय संपूर्ण वीज बिल, सुरक्षा ठेव आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय या ग्राहकांचा वीज पुरवठा जोडण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. ‘मिशन ९० दिवस’ अंतर्गत केवळ ३६ दिवस शिल्लक आहे. जानेवारी पर्यंतंची थकबाकी आणि फेब्रुवारी महिन्याचे चालू वीजबिल पकडून २८० कोटी रूपये महावितरणला वसूल करायचे आहे, परंतू अद्याप फक्त ८५ कोटी रूपयेच वसूल झाले आहे. त्यामुळे महावितरणने वसूली मोहिम तीव्र केली आहे. मुख्य अभियंता राजेश नाईकसह अधीक्षक अभियंते सुरेंद्र कटके,अजय शिंदे आणि प्रतिक्षा शंभरकर यांच्यासह कार्यालयीन कर्मचाऱ्यांना वसूलीसाठी बाहेर काढण्यात आले असून प्रत्येक कर्मचाऱ्याला वीज बिल वसूलीचे उद्धीष्ठ देण्यात आले आहे. वीजबिल भरा नाही तर अंधारात रहा, अशी भूमिका महावितरणने घेतली आहे.
महावितरणच्या कारवाईला अडथळा आणणाऱ्या भागात सामुहिक मोहीम राबविण्याचे स्पष्ट निर्देश मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिले आहेत. तसेच या सामुहिक मोहिमेत स्थानिक अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंतासह मोठ्या प्रमाणात कर्मचारी समावेश असल्याने, कारवाई दरम्यान विरोध केल्यास गुन्हा दाखल करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
असे आहेत वीज ग्राहक
अकोला परिमंडळात असलेल्या २८० कोटीच्या थकबाकीत घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकाचा समावेश असून यात अकोला जिल्हा ११५ कोटी ७४ लाख, बुलडाणा जिल्हा १४४ कोटी आणि वाशिम जिल्ह्याची ५१ कोटी ६५ लाख रूपयाची थकबाकी असून यापैकी अनुक्रमे ४० कोटी, ३२ कोटी आणि १३ कोटी अशी एकुण ८० कोटी रूपये वसूल झाले आहे.



