
अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): शासकीय घरकुल योजनेच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका ५० वर्षीय महिलेला अश्लील शिवीगाळ करत आरोपींनी तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कुरणगाड बुद्रुक (ता. जळगाव जामोद) येथे घडली. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी दोन सख्ख्या भावंडांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
कुरणगाड बुद्रुक (ता. जळगाव जामोद) येथील रहिवासी असलेल्या मिळालेल्या लता विजय अंदुरकार (वय ५० वर्षे) यांना शासनाच्या रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहे. या योजनेतून त्यांनी आपल्या घराचे बांधकामही पूर्ण केले. मात्र, याच गावातील आरोपी किशोर नारायण भारसाकळे (वय ३० वर्षे) आणि सतीश नारायण भारसाकळे (वय २७ वर्षे) यांनी लता विजय अंदुरकार यांना घरकुल मिळाल्याचा राग मनात धरलेला होता. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दोन्ही आरोपींनी फिर्यादीला गाठले. “तुझे घरकुल कसे मंजूर झाले? तू बोगस पद्धतीने आणि पैसे देऊन हे घरकुल मिळवले,” असे म्हणत त्यांनी लता विजय अंदुरकार यांच्यासोबत वाद घातला. तसेच आम्हाला या घरकुलाच्या पैशातून हिस्सा दे, नाहीतर तुला खल्लास करून टाकू, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. आरोपी किशोर भारसाकळे याने पीडित महिलेचा साडीचा पदर धरून ओढत तिचा विनयभंग केला.
याप्रकरणी पीडित महिलेने २५ फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी किशोर आणि सतीश भारसाकळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७४, २९६, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार उमेश शेगोकार हे करीत आहेत.



