जानेफळमध्ये जड वाहनाच्या धक्क्याने डीपीला भीषण आग
आठवडी बाजाराच्या दिवशी मोठा अनर्थ टळला

मेहकर,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे आज २६ फेब्रुवारी रोजी एका जड वाहनाचा विद्युत खांबाला धक्का लागल्याने भीषण शॉर्टसर्किट झाले. या शॉर्टसर्किटमुळे महावितरणच्या डीपीने अचानक पेट घेतल्याने परिसरात मोठी धावपळ उडाली. विशेष म्हणजे, आज जानेफळचा आठवडी बाजार असल्याने परिसरात मोठी गर्दी होती, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जानेफळ येथील मुख्य रस्त्यावरून एक जड वाहन जात असताना, रस्त्यावरून ओलांडणाऱ्या वीजवाहिनीच्या खांबाला या वाहनाचा जोरात धक्का लागला. हा धक्का इतका भीषण होता की, त्यामुळे विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन जोरदार शॉर्टसर्किट झाले. या शॉर्टसर्किटची ठिणगी थेट जवळच असलेल्या महावितरणच्या डीपीमध्ये पडली. काही क्षणातच डीपीने पेट घेतला आणि आगीच्या ज्वाळांनी रौद्र रूप धारण केले. डीपीला आग लागताच परिसरात धुराचे लोट पसरले. या आगीमध्ये डीपीचा मुख्य फ्युज बॉक्स, जोडलेल्या सर्व केबल्स आणि महत्त्वाचे तांत्रिक साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आठवडी बाजार असल्याने या रस्त्यावर नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ होती. आग लागताच परिसरात एकच धावपळ उडाली. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने वीजपुरवठा खंडित केला. यामुळे आग अधिक पसरण्यापासून रोखता आली. स्थानिक ग्रामस्थांनीही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त केली जात होती, परंतु कर्मचाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
वीजपुरवठा खंडित
या आगीमुळे डीपीचे मोठे नुकसान झाले असून, परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. महावितरणकडून नवीन केबल टाकण्याचे आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. संबंधित जड वाहन चालकावर काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



