
खामगाव, दि. २६ (प्रतिनिधी): जिल्ह्यात ‘महा रेशीम अभियान २०२६’ अंतर्गत तुती लागवडीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून ५ मार्चपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. शासनाच्या विविध योजनांमधून अनुदान उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळणार आहे. जून २०२६ मध्ये तुती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी ५ मार्चपूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. हे अभियान गावागावांत राबविण्यात येणार आहे.
पोर्टलवर ऑनलाइन शेतकरी नोंदणी शेतकऱ्यांसाठी ‘आपले सरकार’ ऑनलाइन पोर्टलवर वस्त्रोद्योग विभाग निवडून ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादनातून शेतकरी भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. जिल्ह्यात रेशीम उद्योगासाठी अनुकूल वातावरण असल्याने या व्यवसायात सातत्याने वाढ होत आहे. तुती लागवडीच्या एक एकर क्षेत्रातून दुसऱ्या वर्षापासून दोन लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळत असल्याचे चित्र आहे. मोठ्या प्रमाणावर रेशीम कोष उत्पादन होत असल्याने जालना, बीड, बडनेरा, सोलापूर, बारामती व नागपूर येथे कोष बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत. रेशीम उद्योगाला दिवसेंदिवस प्रचंड प्रतिसाद मिळत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे शासनाचे धोरण या माध्यमातून साध्य होत आहे.रेशीम उद्योगाच्या वाढीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत मनरेगा योजनेअंतर्गत एक एकर अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तुती लागवड व किटक संगोपनगृहासाठी तीन वर्षांत एकूण ८९५ मनुष्यदिवसांची मजुरी दिली जाते. यामध्ये मजुरीपोटी २ लाख ७९ हजार २४० रुपये व एकूण ४ लाख ३२ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. तसेच केंद्र पुरस्कृत ‘सिल्क समग्र-२’ योजनेअंतर्गत तुती लागवड, ठिबक सिंचन, संगोपनगृह बांधकाम, निर्जंतुकीकरण औषधे आदी घटकांसाठी प्रति एकर ३ लाख ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. बहुभूधारक शेतकऱ्यांना दोन एकर क्षेत्रासाठी एकूण ५ लाख ६२ हजार ५०० रुपयांपर्यंत अनुदान मिळते. कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) अंतर्गत एकूण ३ लाख २५ हजार १२५ रुपयांचे अनुदान दिले जाते. मनरेगा व सिल्क समग्र योजनेत नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, भोंडे/भवटे हॉस्पिटलजवळ, मुठ्ठे लेआऊट, धाड रोड, बुलढाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा रेशीम क्षेत्रीय अधिकारी आशिष जोशी यांनी केले आहे.
बोरजवळ्यात जनजागृतीपर सभा
दरम्यान, रेशीम शेतीच्या माहिती व जनजागृतीसाठी बोरजवळा (ता. खामगाव) येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा रेशीम क्षेत्रीय अधिकारी आशिष जोशी, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी बी. एल. कुमावत, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी सौ. अनुपमा भारंबे, तांत्रिक सहाय्यक (पंचायत समिती, खामगाव) गणेश शेलकर, गुळवे तसेच शेतकरी उपस्थित होते.



