राजकारण

मलकापूर नगरपालिकेत अधिकाऱ्यांचा ‘मनमानी’ कारभार

कक्ष अधिकारी पूजा खरात गायब, प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक!

मलकापूर,(प्रतिनिधी) :एकीकडे सरकार ‘शासन आपल्या दारी’चे ढोल वाजवत असताना, दुसरीकडे मलकापूर नगर परिषदेत मात्र जनतेच्या कामांचा बोजवारा उडाला आहे. कार्यालयात जबाबदार पदावर असतानाही आपल्या कर्तव्याला बगल देऊन तासनतास गायब राहणाऱ्या कक्ष अधिकारी पूजा खरात यांच्या विरोधात आता जनक्षोभ उसळला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा ‘प्रहार स्टाईल’ने धडा शिकवू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्प्रमुख अजय टप यांनी दिला आहे.

मलकापूर नगर परिषदेत कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खरात यांच्यावर कार्यालयीन वेळेत कार्यालयातून गायब राहण्याचा गंभीर ठपका प्रहारने ठेवला आहे. खरात यांच्याकडे महत्त्वाच्या कामकाजाची जबाबदारी असतानाही त्या आपल्या कक्षात उपस्थित नसतात. विशेष म्हणजे, त्या सलग २-२ तास कार्यालयातून बेपत्ता राहत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे लांबून आलेल्या सामान्य नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी आज, २७ फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शासकीय पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी जनतेची कामे करणे अपेक्षित आहे, पण येथे अधिकारीच बेपत्ता राहत असतील, तर जनतेने दाद कोणाकडे मागायची?”, असा संतप्त सवाल अजय टप यांनी उपस्थित केला आहे. पूजा खरात या कार्यालयात उपस्थित राहत नसल्याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. जर प्रशासनाने नगर परिषद कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तर कक्ष अधिकारी किती वेळ गायब असतात, हे सत्य जगासमोर येईल, असा दावा देखील टप यांनी केला असून सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या अशा कामचुकार अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन पूजा खरात यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी देखील टप यांनी केली असून या प्रकरणी टाळाटाळ झाल्यास किंवा योग्य कारवाई न झाल्यास सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आपल्या खास ‘प्रहार स्टाईल’ने आंदोलन उभारेल,” असा सज्जड दम अजय टप यांनी निवेदनाच्या शेवटी दिला आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!