शेगाव हादरलं! अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या विकृताच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
'त्या' प्रसादाच्या दिवशीच घडला काळजाचा थरकाप!

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी) : विदर्भाची पंढरी आणि संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव शहरात नातेवाईकांकडे ‘श्रीमद भागवत’ सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढून तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार नुकताच समोर आला.
शहरातील डोबाळवेस माळीपुरा येथील रहिवासी असलेल्या प्रिती अरविंद शेगोकार (वय ४१ वर्षे) या त्यांच्या मुलीला सोबत घेऊन ६ फेब्रुवारी रोजी वियोगीनगर येथील त्यांचे नातेवाईक नंदकिशोर शेगोकार यांच्या घरी आयोजित भागवत समाप्तीच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. भक्तीमय आणि प्रसन्न वातावरणात सर्वजण मग्न असताना, यातील आरोपी अनिकेत बाबुराव खेर्डे (रा. जुने महादेव मंदिर परिसर) याने संधी साधून शेगोकार यांच्या मुलीला एकटे पाहून तिचा रस्ता अडवला. तसेच जबरदस्तीने तिचा उजवा हात पकडून “तू माझ्यासोबत चाल, तू मला खूप आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करतो!”, असे निर्लज्जपणे बोलला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली. तिने कडाडून विरोध करत त्याच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका करून घेत घर गाठले.
२० दिवसांपासून सुरू होता पाठलाग
धक्कादायक बाब म्हणजे, एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही. ६ फेब्रुवारीपासून ते २५ फेब्रुवारीपर्यंत तो सतत त्या मुलीचा पाठलाग करत होता. “जर तू माझ्याशी बोलली नाहीस तर बघून घेईन,” अशा धमक्या देत त्याने मुलीचे जगणे कठीण केले होते. सततच्या दहशतीमुळे मुलीने अखेर हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. मुलीच्या आईने शेगाव शहर पोलीस स्टेशन गाठून आरोपी अनिकेत खेर्डेविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५, ७८, ३५१ (२) सह कलम ८, १२ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे आणि पोउपनि संदीप बरिंगे यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बरिंगे हे करीत आहेत.



