क्राईम जगत
धक्कादायक! राजकोटच्या सासरकडून मलकापूरच्या विवाहितेचा छळ
माहेरून १ लाख आणण्यासाठी मारहाण करून दिली जीवे मारण्याची धमकी

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : एका बाजूला महिलांच्या सुरक्षेच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे हुंड्यासाठी आणि चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ होण्याच्या घटना काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. गुजरात राज्यातील राजकोट येथील सासरच्या मंडळींनी एका २७ वर्षीय विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मूळ सागनवा (जि.राजकोट, गुजरात) येथील रहिवासी असलेल्या व सध्या मलकापूर येथे वास्तव्यास असलेल्या संध्या संजय वरमोरा (वय २७ वर्षे) यांचा विवाह आरोपी संजय मनसुखभाई वरमोरा याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवस सुखाने संसार करणाऱ्या पती संजय याने १५ ऑगस्ट २०२४ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान संध्याच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर, “फ्लॅट घेण्यासाठी तुझ्या माहेरून १ लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला घरात नांदवणार नाही” अशी धमकी देत तिला वारंवार मारहाण करण्यात आली. या छळात त्याला दीर दिलीप मनसुखभाई वरमोरा, जाऊ काजल दिलीप वरमोरा, सासरा मनसुखभाई बच्चुभाई वरमोरा आणि सासू रंजनाबाई मनसुखभाई वरमोरा यांनी देखील साथ दिली.
याप्रकरणी संध्या संजय वरमोरा यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार संजय निबोळकर हे करीत आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पीडित विवाहितेला न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे.



