
अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): शहरातील मुख्य बाजारपेठ भागात असलेल्या एका दुकानाच्या जागेवरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन आरोपींनी एका महिलेवर चाकूने वार करून तिला जखमी केले. या घटनेमुळे शहरात एकाच खळबळ उडाली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी एका महिलेसह तिच्या मुलावर आणि इतर दोन अनोळखी महिलांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मलकापूर शहरातील गोकुळधामनगर परिसरातील रहिवासी असलेल्या वैशाली निलेश भारंबे (वय ३२ वर्षे) या सोडा गाडी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्या शहरातील रंगोली ड्रेसेस समोर उभ्या असताना दुकानाच्या जागेच्या कारणावरून आरोपी सुरेखा विलास लांबोडे हिने वैशाली भारंबे यांना अश्लील शिवीगाळ केली. वादाचे स्वरूप वाढत गेल्याने सुरेखा यांचा मुलगा शुभम विलास लांबोडे (वय २३ वर्षे) याने रागाच्या भरात वैशाली यांच्या हातावर लहान चाकूने वार करून त्यांना जखमी केले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अन्य दोन अनोळखी महिलांनीही वैशाली यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. भरदिवसा बाजारपेठेच्या परिसरात एका महिलेवर चाकूने हल्ला झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. किरकोळ कारणावरून गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. फरार असलेल्या अन्य दोन महिलांचा शोध पोलीस घेत असून, आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याप्रकरणी वैशाली भारंबे यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झेंडगे हे करीत आहेत.



