स्मार्ट बुलढाणा
“समृद्धी”वर पुन्हा मृत्यूचा थरार!
धावत्या खुराणा बसचा कोळसा; काळाच्या जबड्यातून ३५ प्रवाशी सुखरूप

मेहकर,(प्रतिनिधी): गेल्या काही महिन्यांपूर्वी २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा मृत्यूचा थरार पाहायला मिळाला. उपराजधानी नागपूरहून राजधानी मुंबईकडे जाणाऱ्या खुराणा ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसला मेहेकर तालुक्यातील शिवणी पिसा गावाजवळ भीषण आग लागली. काही क्षणांतच रौद्र रूप धारण केलेल्या बसचा जळून कोळसा झाला. बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे ३५ प्रवाशांचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला.
खुराणा ट्रॅव्हल्सची खाजगी बस प्रवासी घेऊन नागपूरवरून मुंबईकडे जात होती. सदर बस मेहेकर परिसरात पोहोचताच चालकाला बसमधून धूर निघत असल्याचे जाणवले. चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ बस महामार्गाच्या कडेला उभी केली आणि प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. प्रवासी खाली उतरत असतानाच आगीने संपूर्ण बसला विळखा घातला. आग इतकी भीषण होती, की पाहता पाहता बसचा सांगाडा झाला. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी बसमधून बाहेर उड्या घेतल्या. यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आगीत अनेक प्रवाशांचे मौल्यवान सामान जळून राख झाले. चालकाने वेळीच बस थांबवून आरडाओरड केली नसती, तर आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर रक्ताचा सडा पाहायला मिळाला असता. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेत आग विझवली.मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे जळून कोळसा झाली होती. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
मृत्यूचा सापळा?
गेल्या काही महिन्यांपूर्वी याच महामार्गावर बस जाळल्याने २६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच दुसरी घटना घडली. त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



