बुलढाणा,(प्रतिनिधी):रामनामाची शक्ती आघात आहे. आज सर्व भारतभूमी रामनवमीनिमित्त राममय झाली आहे. चैतन्यदायी रामरायाची मूर्ती आपल्यासमोर उभी आहे. आपल्या विचलित मनाला आवर घालण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. बुवाबाजीच्या नादी लागण्याची देखील गरज नाही. महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेने आपल्याला अनुभवातून नामस्मरणाचा मार्ग सांगितला आहे. कलयुगात तरुन जाण्यासाठी “श्रीराम जय राम जय जय राम” असे त्रयोदक्षाक्षरी नामस्मरण आणि अन्नदान अट्टाहासाने करा, असे मौलिक मार्गदर्शन समर्थ सद्गुरु श्री श्रीहरी महाराज यांनी केले.
रामनवमी निमित्त श्री श्रेत्र माकोडी येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अखंड नामस्मरण यासह विविध धार्मीक कार्यक्रम पार पडले. रामनवमी उत्सव सोहळ्या निमित्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीहरी महाराज पुढे म्हणाले की, ईश्वराचा अवतार हा दृष्टांचा संहार, नाश करण्यासाठी असतो. मात्र संत, सदगुरु हे मार्ग चुकलेल्यांना देखील चांगला मार्ग दाखवितात. भगवंताची मनापासून सेवा केल्याने त्याच्या नामाची गोडी लागते. आणि यातून मग जीवनाचे खरे मर्म समजते. त्यामुळे प्रत्येकाने दररोज थोडे का होईना रामनामाचा जप करावा, असे सांगितले. रामनवमी निमित्त धामणगाव बढे सह परिसरातील भाविकांच्या दिंड्या देखील श्रीक्षेत्र माकोडी येथे दाखल झाल्या होत्या.
यावेळी राम जन्मसोहळ्याच्या किर्तनात हभप ज्ञानेश्वरी माऊली निरपूकर यांनी सद्गुरु महिमा सांगितला. सद्गुरुंसाठी सज्जन-दुर्जन सर्वसृष्टी त्यांच्यासाठी रामरुप असते. नामस्मरणातच मनुष्य जीवनाचे हित असून इश्वर प्राप्तीसाठी सदगुरु कृपा होणे आवश्यक आहे. सदगुरुच जीवनाचा उध्दार करु शकतात असे प्रतिपादन केले. तत्पुर्वी रामनवमी निमित्त २६ मार्चला सकाळी काकडा आरती, अभिषेक व विधिवत पुजाअर्चा पार पडल्यानंतर आकर्षक सजविलेल्या रामरथासह श्रीहरी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत गावातून शोभायात्रा काढण्यात आली. भगवे झेंडा धारी सेवक, टाळ-मृदगांचा गजर, राम नामाचा जयघोष करीत भाविकांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. शोभायात्रेत महिला-पुरुष भाविकांनी आनंदोत्सव साजरा करीत फुगड्यांचे फेर धरले.
प्रभू रामचंद्राच्या जयघोषाने माकोडी दुमदुमन गेली होती. शोभायात्रेच्या स्वागतासाठी परिक्रमा मार्गात सडासर्माजन करुन आकर्षक रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुपारी रामजन्म सोहळा साजरा करण्यात आला. २७ मार्च रोजी गोपाल काल्याचे कीर्तन झाल्यावर नैवेद्य आरती नंतर महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.