अजय टप
लोणार,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेच्या मोठ्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे मात्र एका १५ वर्षांच्या निष्पाप मुलीला जीव गमावूनही महिनाभर न्याय मिळत नसल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना बुलढाणा जिल्ह्यात समोर आली आहे. सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावे स्पष्टपणे लिहून ठेवलेली असतानाही, पोलिसांकडून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस प्रशासनाच्या या कथित ढिसाळ कारभाराविरुद्ध पीडित मुलीच्या हताश पित्याने आता थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

लोणार तालुक्यातील चिखला येथील रहिवासी संतोष काकड यांची १५ वर्षीय मुलगी कुमारी तनुजा संतोष काकड (इयत्ता १० वी) हिने गत १४ एप्रिल २०२६ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ज्ञानेश्वर बुधवत आणि स्वाती बुधवत या पती-पत्नीकडून होणारा सततचा मानसिक त्रास, शोषण आणि अत्याचाराला कंटाळून तनुजाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी तनुजाने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये या दोन्ही आरोपींच्या नावांचा स्पष्ट उल्लेख आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर १७ एप्रिल २०२६ रोजी ‘बीबी पोलीस स्टेशन’ येथे गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल होऊन महिना उलटून गेला तरी तपास यंत्रणेने आरोपींना अटक केलेली नाही. एका अल्पवयीन मुलीचा जीव जाऊनही पोलिसांची ही संथ भूमिका समाजाला अत्यंत चुकीचा संदेश देणारी ठरत आहे. आरोपी अजूनही फरार असून मोकाट फिरत असल्याने पीडित कुटुंबाच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे संपूर्ण कुटुंब सध्या प्रचंड मानसिक भीती आणि असुरक्षिततेच्या छायेत जगण्यास हतबल झाले आहे.
पीडित पित्याची पोलीस अधीक्षकांकडे आर्त हाक
न्याय मिळत नसल्याने अखेर हतबल झालेल्या संतोष काकड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांना लेखी निवेदन देऊन प्रशासनाला धारेवर धरले आहे. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. प्रकरणाचा कोणताही राजकीय दबाव न घेता निष्पक्ष, वेगवान आणि उच्चस्तरीय तपास व्हावा. संशयित आरोपी मोकाट असल्याने पीडित कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे. तपास प्रक्रियेत कोणतीही हलगरजी खपवून घेतली जाऊ नये, अशी मागणी देखील पीडित पित्याने केली आहे.
तरीही प्रशासन ढिम्म का?
आरोपी मोकाट असल्याने माझ्या कुटुंबाला धोका आहे. जर ठराविक कालावधीत आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही, तर माझ्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी माझ्याकडे लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. उपोषणादरम्यान माझ्या जीवितास किंवा आरोग्यास काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन व तपास यंत्रणेची राहील, असा इशारा पीडित पित्याने दिला आहे.
