धाड,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):‘जय जवान, जय किसान’च्या घोषणा हवेत विरल्या असून आज बळीराजाला डिझेलच्या एका-एका थेंबासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. सध्या सर्वत्र पेट्रोल-डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, मैलोन्मैल वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. त्यातच पेट्रोल पंप चालकांची मुजोरी इतकी वाढली आहे की, हक्काचे डिझेल मागणाऱ्या शेतकऱ्यांना हुकूमशाही पद्धतीने नकार दिला जात आहे. याच अन्यायाविरोधात आणि प्रशासनाच्या झोपलेल्या कारभाराविरोधात धाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बंडू उर्फ समाधान नागवे यांनी संताप व्यक्त केला.
शेतकऱ्यांचा महत्त्वाचा शेतीचा हंगाम तोंडावर आहे. ट्रॅक्टर आणि इतर यंत्रांसाठी डिझेलची नितांत गरज आहे. डिझेलअभावी शेतकऱ्यांचा हंगाम वाया जाण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकऱ्यांसोबत पंपावर वाद-विवाद आणि अपमानास्पद वागणूक मिळत आहे. दरम्यान, धाड येथील एका पेट्रोल पंप चालकाने डिझेल देण्यास थेट नकार देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. पंप चालकाच्या या मनमानी आणि उद्दाम कारभाराविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बंडू उर्फ समाधान नागवे यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज चौक गाठत ‘डिझेल पाहिजे, डिझेल द्या’, अशा घोषणा देत चौकातच ठिय्या मांडला. नागवे यांची घोषणाबाजी ऐकून शेकडो शेतकऱ्यांचा जमाव चौकात गोळा झाला. त्यामुळे सुमारे १५ ते २० मिनिटे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. हा केवळ रस्ता रोको नव्हता, तर सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात जनतेने व्यक्त केलेला तीव्र निषेध होता. काही वेळानंतर पोलिसांनी समाधान नागवे यांना ताब्यात घेऊन त्यांची समजूत काढली आणि वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली. मात्र, बळीराजाला आजही डिझेलसाठी पंपावर भिकारी असल्यासारखे उभे राहावे लागत आहे. मुजोर पंप चालक आणि झोपलेले सरकार यांच्या या ‘जुगलबंदी’त सामान्य शेतकरी पुरता होरपळून निघत आहे.
