मलकापूर नगर परिषदेच्या कारभाराविरोधात प्रहार आक्रमक; मुख्याधिकार्‍यांच्या खुर्चीला दिले ‘बेशरम’चे झाड!

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो ):शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची झालेली अत्यंत दयनीय अवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि त्याकडे नगर परिषद प्रशासनाकडून होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रहार संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. आज, ६ जुलै रोजी प्रहारचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद प्रशासनाविरोधात एक अनोखे आंदोलन करण्यात आले. मुख्याधिकारी कार्यालयात हजर नसल्याचे पाहून संतप्त कार्यकर्त्यांनी थेट मुख्याधिकार्‍यांच्या खुर्चीला ‘बेशरम’चे झाड देऊन प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला.

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या समस्येची दखल घेत अजय टप यांनी ३० जून रोजी नगर परिषद मुख्याधिकार्‍यांना निवेदन देऊन तातडीने सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी केली होती. त्यानंतर १ जुलैपासून नगर परिषद प्रशासनाने काही मोजक्या ठिकाणी मुरूम, खडी व चुरी टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले खरे, मात्र हे काम केवळ ठराविक भागापुरतेच मर्यादित राहिल्याचा आरोप प्रहारने केला आहे. शहरातील अनेक मुख्य व अंतर्गत रस्ते आजही खड्ड्यांनी व्यापलेले असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नगर परिषद प्रशासन काही भागांनाच प्राधान्य देत उर्वरित भागांवर अन्यायकारक पध्दतीने दुर्लक्ष करत असल्याचे अजय टप यांनी म्हटले आहे. आज रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मुख्याधिकार्‍यांना जाब विचारण्यासाठी अजय टप नगर परिषद कार्यालयात गेले असता मुख्याधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. आधीच खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या आणि त्यात प्रशासनाचा ढिम्म कारभार पाहून संतप्त झालेल्या अजय टप यांनी मुख्याधिकार्‍यांच्या खुर्चीला ‘बेशरम’चे झाड दिले आणि प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

…तर आणखी तीव्र जनआंदोलन छेडणार!

शहरातील नागरिक खड्ड्यांमुळे हैराण असताना नगर परिषद प्रशासनाला त्याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे यावरून दिसून येत आहे. या आंदोलनानंतर प्रहार संघटनेने प्रशासनाला कडक इशारा दिला असून शहरातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास, प्रहार संघटनेच्या वतीने नगर परिषद प्रशासनाविरोधात यापेक्षाही अधिक तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील प्रहारचे उपजिल्हाप्रमुख अजय टप यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!