अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. सायबर क्राईमच्या एका धक्कादायक प्रकरणासह, हायवेवरील अवैध गोवंश तस्करी, अल्पवयीन मुलांना तंबाखू विक्री आणि आत्महत्येसारख्या गंभीर घटना समोर आल्या आहेत. जिल्हा पोलिसांनी या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेत कडक कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
शिक्षण क्षेत्रात खळबळ: CBSE पोर्टल हॅक करून विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये फेरफार
खामगाव: जवळील सजनपुरी येथील ‘युगधर्म पब्लिक स्कूल’ या शाळेच्या अधिकृत लॉगिन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून एका अज्ञात हॅकरने थेट CBSE च्या मुख्य वेबसाईटवर (www.cbse.gov.in) डल्ला मारला. या हॅकरने इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या (Practical Marks) गुणांमध्ये आणि एका विद्यार्थ्याच्या नावात फेरफार करून विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान व फसवणूक केली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलीस स्टेशन, बुलढाणा येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संग्राम पाटील या हायटेक गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
हायवेवर धाडसी नाकाबंदी; ६ लाखांच्या मुद्देमालासह अवैध गोवंश वाहतूक जप्त
नांदुरा: पोलिसांनी मलकापूर बायपास नॅशनल हायवे NH 53 वर मोठी कारवाई केली आहे. मुक्ताईनगरकडून खामगावकडे जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या बुलेरो पिकअप वाहनाला (MH-06-BG-4125) पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान थांबवले. वाहनामध्ये पुरेशी जागा नसतानाही अत्यंत निर्दयतेने आणि दाटीवाटीने ४ गोवंश बैल भरून वाहतूक केली जात होती. यामध्ये काही प्राण्यांना गंभीर दुखापतही झाली होती. कारवाईत अंदाजे एक लाख रुपये किमतीचे ४ बैल आणि ५ लाख रुपयांचे पिकअप वाहन, असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी दानिश सैय्यद जहीर सैय्यद (वय २४ वर्षे) रा. मुक्ताईनगर याच्याकडे गोवंशाच्या मालकी हक्काची कोणतीही कागदपत्रे किंवा ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याने, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापुरात तरुणाचे टोकाचे पाऊल; गळफास लावून आत्महत्या
मलकापूर: शहरातील रामवाडी भागात राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेनंतर कुटुंबाने मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे आणला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी मेमोवरून मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस हेकॉ चंद्रकांत शिंदे या प्रकरणाचा प्राथमिक तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलांना तंबाखू विकणाऱ्या दुकानदारावर ‘कोटपा’ कायद्यांतर्गत गुन्हा
एमआयडीसी दसरखेड: पोलीस स्टेशन अंतर्गत नरवेल गावात पोलिसांनी एका किराणा दुकानाविरुद्ध धडक कारवाई केली आहे. १८ वर्षांखालील एका अल्पवयीन मुलाला तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना दुकानदाराला पोलिसांनी पंचांसमक्ष रंगेहात पकडले. दुकानाच्या झडतीमध्ये गायछाप तंबाखू आणि बिडीचा साठा जप्त करण्यात आला आहे. आरोपी दुकानदार शामसिंग रामसिंग चव्हाण (वय ४६ वर्षे) याच्यावर ‘कोटपा’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास पोलीस अंमलदार राजेश बावने यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
जिल्ह्यातून दोन महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू
जळगाव जामोद: राहत्या घरातून एक ६६ वर्षीय वृद्ध महिला अचानक निघून गेल्या आहेत. नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु त्या मिळून आल्या नाहीत. जळगाव जामोद पोलिसांनी या प्रकरणी मिसिंगची नोंद केली आहे.
शेगाव शहर: संग्रामपूर तालुक्यातील एक १८ वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबासह शेगाव येथील गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी आली होती. बहीण बाथरूमला गेली असता, सदर तरुणी मंदिर परिसरातून अचानक बेपत्ता झाली. बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेऊनही ती न सापडल्याने शेगाव शहर पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
