अजय टप
बुलढाणा,(हिंद वार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यातील मलकापूर शहर, धाड आणि एमआयडीसी दसरखेड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १६ सप्टेंबर रोजी विविध घटनांप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये अवैध दारू, वरली-मटका जुगार, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, मारहाण व जीवे मारण्याची धमकी देणे अशा प्रकरणांचा समावेश आहे. तसेच रायपूर पोलीस ठाण्यात २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.
मलकापूर: मलकापूर शहरातील गुरुद्वाराजवळ सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत शेख सईद शेख बशीर याच्या ताब्यातून ३५ लिटर क्षमतेच्या कॅनमध्ये सुमारे २३ लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. जप्त दारूची किंमत सुमारे २ हजार ३०० रुपये आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
मलकापूर: कामगार चौक मलकापूर येथे सागर किसन रोहणकर याच्यावर जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून ३५० रुपये रोख, वरली-मटका आकडे लिहिलेली चिठ्ठी आणि डॉटपेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मलकापूर: तहसील चौक मलकापूर येथे महादेव दुर्योधन पाथरकर हा मोटारसायकलवरून वाकड्या-तिकड्या पद्धतीने वाहन चालविताना आढळून आला. वैद्यकीय तपासणीत त्याने मद्यप्राशन केले असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
मलकापूर: तामीर-ए-मिल्लत उर्दू प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील वादातून मुख्याध्यापक नजरुल्ला खान नसरुल्ला खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम २९६, ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शाळेची चावी हिसकावणे, शिवीगाळ, मारहाण, जीवे मारण्याची धमकी तसेच शाळेला कुलूप लावल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याच शाळेतील घटनेप्रकरणी मुख्याध्यापिका उजमा परवीन मो. आतिफ यांच्या फिर्यादीवरून नजरुल्लाह खान नसरुल्लाह खान यांच्यासह चार जणांविरुद्धही कलम २९६, ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालेय पोषण आहाराचे साहित्य उतरविण्यावरून वाद झाल्यानंतर मारहाण, अश्लील शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
एमआयडीसी दसरखेड: म्हैसवाडी येथे जुन्या वादातून श्रीकृष्ण निवृत्ती धाडे याने एकनाथ बास्सु लोणे यांना काठीने डोक्याच्या मागील बाजूस मारल्याची तक्रार दाखल झाली. या घटनेत लोणे यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिताचे क लम ११८ (१), ३५१ (२)(३), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाड: धाड येथील मच्छी मार्केट परिसरात विनोद उखर्डा परमेश्वर याच्याकडून २७० रुपये रोख, डॉटपेन व वरली-मटका चिठ्ठी असा २७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे मढ फाट्यावरील रोषण हॉटेलजवळ राजू किसन पोपळघट याच्यावर कारवाई करून ३४५ रुपये रोख, डॉटपेन व मटका चिठ्ठ्या, असा ३५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हे दाखल करून संबंधितांना नोटीस देण्यात आली.
रायपूर: रायपूर पोलीस स्टेशन हद्दित येणाऱ्या पिंपळगाव सराई येथील शामल भगवान पाटोळे (वय २० वर्षे) ही १५ सप्टेंबरच्या रात्री घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी रायपूर पोलिसांत दिली. रात्री झोपल्यानंतर ती घरात दिसून न आल्याने कुटुंबीयांनी परिसर, गाव, नातेवाईक व शेजारी यांच्याकडे शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी मिसिंग दाखल करण्यात आली आहे. विविध घटनांतील तपास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला असून, सर्व प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.
