अंढेराच्या हद्दीत वाळू तस्करांना एलसीबीचा दणका!;महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात ४ टिप्परांसह २४ ब्रास रेती जप्त; तब्बल १ कोटी १० लाख ८४ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा जोरदार कारवाई करत वाळू तस्करांना मोठा दणका दिला. अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज ११ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ४ टिप्पर व त्यामध्ये असलेली २४ ब्रास रेती, असा एकूण १ कोटी १० लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडाकेबाज कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

महिला अधिकारी असूनही गुन्हेगारांविरोधातील कारवाईत कोणतीही तडजोड न करता पुरुष अधिकाऱ्यांनाही लाजवेल अशा धडाडीने कारवाया करणाऱ्या अधिकारी म्हणून यशोदा कणसे यांची जिल्ह्यात वेगळी ओळख आहे. दरम्यान, अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरीत्या गौण खनिजाची चोरी व वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केली. कारवाईदरम्यान चार टिप्परमध्ये वाहतूक केली जात असलेली एकूण २४ ब्रास रेती आढळून आली. पोलिसांनी तत्काळ वाहने व रेती, असा १ कोटी १० लाख ८४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन अंढेरा यांच्या ताब्यात दिला. या कारवाईत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३०३(२) तसेच २१(१), २१(२) गौण खनिज अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. कणसे यांनी यापूर्वीदेखील बुलढाणा जिल्ह्यात विविध प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात प्रभावी कारवाया करत गंभीर व किचकट गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून, कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हेगारीवर कठोर प्रहार करण्याची कार्यपद्धती त्यांनी कायम ठेवली आहे.

यांनी घेतला कारवाईत सहभाग

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोलीस अंमलदार शरद गिरी, जगदेव टेकाळे, पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, विजय वारुळे, अमोल अंभोरे, मंगेश सनगाळे, अमोल वनारे आणि मनोज खरडे यांचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!