अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध धंदे, चोरी, मद्यप्राशन करून वाहन चालविणे आणि इतर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी प्रभावी कारवाई करण्यात आली. ६ सप्टेंबर रोजी नांदुरा, धाड, मलकापूर शहर, बोराखेडी आणि एमआयडीसी दसरखेड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले.
नांदुरा: पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शाईन कॉलनी परिसरातील एका गोदामाची पंचांसमक्ष झडती घेतली. यावेळी विद्युत वितरण प्रणालीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ॲल्युमिनियमच्या तारा वजन अंदाजे १९७ किलो, किंमत सुमारे ३९ हजार ४०० रुपये, असा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी शेख अहेमद शेख निसार (वय ३५ वर्षे) रा. शाईन कॉलनी, नांदुरा याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
धाड: पोलिसांनी वाहन तपासणी व पेट्रोलिंगदरम्यान दोन स्वतंत्र कारवाया केल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोसम मुसा तडवी (वय ३७ वर्षे) रा. दहीद बुद्रूक हा मोटारसायकल निष्काळजीपणे व वेडीवाकडी चालविताना आढळून आला. वैद्यकीय तपासणीत तो मद्याच्या अमलाखाली असल्याचे निष्पन्न झाले. याच ठिकाणी दुसऱ्या कारवाईत ज्ञानदेव नामदेव वाघ (वय ४५ वर्षे) रा. सावळी यालाही मोटारसायकल भरधाव व निष्काळजीपणे चालविताना पकडण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तोदेखील मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही प्रकरणांत मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मलकापूर शहर: पोलिसांनी संत ज्ञानेश्वर नगर परिसरात पहाटे पेट्रोलिंगदरम्यान चार संशयितांना ताब्यात घेतले. संजय विकास तायडे, अक्षय मनोहर निशानकर, सचिन सुभाष तायडे आणि अजय संजय खिरडकर हे चौघेही चेहऱ्यावर रुमाल बांधून वेश बदलून अंधाऱ्या गल्लीत संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. चौकशीदरम्यान समाधानकारक माहिती न मिळाल्याने त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाड: पोलीस ठाण्यात लग्नाचे स्थळ आणून देण्याच्या नावाखाली दीड लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. धामणगाव येथील तरुणाचे लग्न सविता अण्णा सांगळे हिच्यासोबत मर्दडी देवी संस्थान (दुधा) येथे झाले होते. लग्नानंतर काही दिवसांतच पत्नी घरातून निघून गेली. याप्रकरणी नारायण आंधळे याच्यासह एकूण पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ६१ (२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी दसरखेड: पोलिसांनी रणथम बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर कारवाई करताना एमएसईबीच्या डीपीची तार चोरी करताना दोन आरोपींना पकडले. प्रतापसिंग सुरजसिंग बावरी आणि कपुरसिंग सुरजिसंग बावरी यांच्यासह दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत ॲल्युमिनियम तार, लोखंडी तार कटर आणि छोटा हत्ती वाहन, असा एकूण ५ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मोताळा येथील पाचपीर दर्ग्याजवळ छापा टाकून शेख साहील शेख रफिक (वय १९ वर्षे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ किलो १७० ग्रॅम गांजा, अंदाजे ५८ हजार ५०० रुपये किमतीचा, जप्त करण्यात आला. एनडीपीएस कायद्यानुसार बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापूर शहर: तहसील चौक येथे दारासिंग रामसिंग चव्हाण (वय ४१ वर्षे) हा मोटारसायकल अनियंत्रित व वाकड्या पद्धतीने चालविताना आढळून आला. वैद्यकीय तपासणीत तो मद्याच्या अमलाखाली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
धाड: चांडोळ येथे मोटारसायकलने शेताकडे जात असलेल्या चरणसिंग भगवानसिंग भुसारे यांना रस्ता सोडण्याच्या कारणावरून आरोपींनी मारहाण केल्याचा आरोप आहे. सुभाष रामसिंग धनावत, कुणाल सुभाष धनावत, मनोज रामेश्वर धनावत आणि दीपक धनराज धनावत यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये लाठीने मारहाण, लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद आहे.
बोराखेडी: बोराखेडी पोलीस ठाण्यात २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. ६ सप्टेंबर रोजी ती शेतातून घरी आल्यानंतर काही वेळाने घरातून बेपत्ता झाली. तिचे वर्णन उंची अंदाजे ५ फूट ३ इंच, गोरा रंग, लांब चेहरा, मोठे केस, अंगात हिरवट रंगाचे टी-शर्ट व हिरव्या रंगाची लोअर आणि हिरव्या रंगाच्या सँडल असे आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १४० (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. वरील सर्व प्रकरणांचा संबंधित पोलीस ठाण्यांकडून पुढील तपास सुरू असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून पेट्रोलिंग, वाहन तपासणी आणि अवैध कृत्यांविरुद्ध कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.
