डीपीची तार चोरताना पकडला; रुग्णालयातून पळाला अन् भुसावळात पुन्हा जाळ्यात! मलकापूरच्या आरोपीचा पोलिसांना गुंगारा; भुसावळच्या दिपनगरातून आवळल्या मुसक्या; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

अजय टप
बुलडाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):रणथम येथे एमएसईबीच्या डीपीची तार चोरी करताना पोलिसांच्या हाती लागलेला आरोपी वैद्यकीय तपासणीदरम्यान बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातून पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला, मात्र गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढत दिपनगर (भुसावळ) येथून त्याच्या पुन्हा मुसक्या आवळल्या. नव्हेतर त्याला मदत केल्याच्या संशयावरून त्याच्या भावालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या कारवाईमुळे मलकापूर तालुक्यातील तार चोरीच्या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे.

दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये प्रतापसिंग सुरजसिंग बावरी (वय २० वर्षे) व कपूरसिंग सुरजिसंग बावरी (वय २५ वर्षे) दोघेही रा. म्हाडा कॉलनी (मलकापूर), तसेच दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ६ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास रणथम बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील एमएसईबी डीपीची तार कटरच्या सहाय्याने कापून चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असताना संबंधित आरोपी मिळून आले होते. त्यांच्याकडून अंदाजे ५ हजार ५०० रुपयांची ॲल्युमिनियम तार, एक हजार रुपयांचा लोखंडी तार कटर आणि सुमारे ५ लाख रुपये किमतीचे छोटा हत्ती वाहन, असा एकूण ५ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या कारवाईनंतर प्रतापसिंग बावरी व कपूरसिंग बावरी यांना पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. यावेळी पोलिसांच्या ताब्यात असलेला प्रतापसिंग हा रात्री तीन वाजता रुग्णालयातील स्वच्छतागृहाच्या खिडकीतून पसार झाला होता. आरोपी पसार झाल्याने पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.

दरम्यान, आरोपीला त्याचा भाऊ तुफानसिंग सुरजसिंग बावरी (वय १९ वर्षे) रा. म्हाडा कॉलनी, मलकापूर हा पोलिसांच्या कारवाईपासून वाचविण्यास मदत करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता, प्रतापसिंग हा तुफानसिंगसोबत दिपनगर (भुसावळ) येथे आढळून आला. दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी दसरखेड एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपींकडून बजाज पल्सर मोटारसायकल व दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस अंमलदार संदीप पवार हे करीत आहेत. प्रतापसिंगविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यातही गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल आहे, हे विशेष!

यांनी बजावली कामगिरी

पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोलीस अंमलदार दीपक लेकुरवाळे, चॉंद शेख, विजय पैठणे, गणेश पाटील, गजानन गोरले, निलेश राजपूत, तांत्रिक विश्लेषक राजू आडवे व कैलास ठोंबरे यांच्या यांनी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!