अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या दोन दिवसांत मिसिंग, अकस्मात मृत्यू, वीजतार चोरी आणि अवैध दारूविक्री अशा विविध घटनांची नोंद झाली आहे. संबंधित पोलीस ठाण्यांत प्रकरणे दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
मलकापूर ग्रामीण हद्दीत २३ वर्षीय तरुणी बेपत्ता
मलकापूर ग्रामीण: वरखेड येथील २३ वर्षीय दिपाली संजय माल्टे ही ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली. नातेवाईक, मैत्रिणी आणि परिसरात शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. दिपालीचा रंग सावळा, बांधा सडपातळ, उंची सुमारे ५ फूट ५ इंच असून तिच्या डाव्या हातावर ‘दिपाली’ नाव गोंदलेले आहे. ती काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, निळ्या रंगाचा पायजमा आणि पांढऱ्या रंगाच्या सॅण्डलमध्ये घराबाहेर पडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
वडोदा येथे ७० हजारांची वीजतार चोरी
मलकापूर ग्रामीण: वडोदा परिसरातील वाघूळ शेती वाहिनीवरील रेल्वे गेटजवळील शेतीपंपाच्या डीटीसीवरील लघुदाब वाहिनीचे १५ गाळे अॅल्युमिनियम तार, अंदाजे ७० हजार रुपये किमतीचे, अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार आहे. ही घटना २५ ऑगस्टच्या रात्री २ ते पहाटे ५ वाजेदरम्यान घडल्याचे नमूद आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
धुपेश्वर नदीपात्रात बुडून ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मलकापूर: मलकापूर येथील राजेश विठ्ठल सिंग राजपूत ( वय ४८ वर्षे) यांचा धुपेश्वर येथील पूर्णा नदीपात्रात पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथे आणण्यात आला होता. या घटनेचा तपास सुरू आहे.
विवरा येथे विषप्राशनाने ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मलकापूर: विवरा येथील गजानन नामदेव सांगळकर (४०) यांनी विषप्राशन केल्याने त्यांना मृतावस्थेत उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. २७ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
मेहकरमध्ये १९ वर्षीय तरुणी बेपत्ता
मेहकर: कळपविहीर येथून नम्रता गोपाल पिसे (१९ वर्षे ५ महिने) ही ३० ऑगस्ट रोजी घरातून निघून गेली. कुटुंबीयांनी गाव, परिसर आणि नातेवाईकांकडे शोध घेतला; मात्र तिचा शोध लागला नाही. नम्रता गोऱ्या रंगाची, सडपातळ बांध्याची असून तिची उंची सुमारे ५ फूट ३ इंच आहे. ती काळ्या रंगाचा वनपीस, काळ्या रंगाची लेगिन्स आणि पायतळी रंगाची साधी चप्पल परिधान करून होती.
लोणारमध्ये पत्नी बेपत्ता; ७० हजार रुपये व दागिनेही सोबत
लोणार: सावरगाव मुंढे येथील पूजा समाधान राठोड (वय २२) ही १ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर घरातून बेपत्ता झाली. घरातील रोख ७० हजार रुपये तसेच लहान मुलीचे दागिने सोबत घेऊन गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. पूजाचा रंग गोरा, उंची सुमारे ५ फूट आणि बांधा सडपातळ आहे. तिच्या अंगावर हिरवा ड्रेस असून ती मराठी, हिंदी आणि बंजारा भाषा बोलते. पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे.
डोणगाव बसस्थानकावरून महिला व तीन वर्षांचा मुलगा बेपत्ता
डोणगाव: अकोला जिल्ह्यातील उमरवाडी येथील पूजा सागर गावंडे (वय २३) ही आपल्या अंदाजे तीन वर्षीय मुलगा रुद्राक्ष याच्यासह बेपत्ता झाली आहे. डोणगाव बसस्थानक हे घटनास्थळ नमूद करण्यात आले आहे. पूजाने भुरकट पिवळ्या रंगाची साडी व हिरवा ब्लाऊज, तर रुद्राक्षने पिवळ्या रंगाचा नेहरू शर्ट व काळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
ढालसावंगी शिवारात शेतात ४५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
धाड: सागवण येथील संजय प्रल्हाद खांडवे (वय ४५) हे मुलासोबत शेतात सोयाबीनवर फवारणी करत होते. मुलगा पंपात औषध भरण्यासाठी परत आला असता संजय खाली पडलेल्या अवस्थेत दिसले. तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरू केला आहे.
नरवेलमध्ये अवैध देशी दारू जप्त
मलकापूर: नरवेल येथे पोलिसांनी कारवाई करत ९० मिलीच्या देशी दारूच्या १० बाटल्या, एकूण ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल, जप्त केला. या प्रकरणी पुरुषोत्तम लहु नारखेडे (वय ४६) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला कलम ३५(३) अन्वये नोटीस देऊन जागेवरच सोडण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यातील या सर्व घटनांचा संबंधित पोलीस ठाण्यांकडून स्वतंत्रपणे तपास सुरू असून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक चौकशी केली जात आहे.
