धाड,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):धामणगाव व परिसरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारू विक्री आणि जुगाराच्या अड्ड्यांवर धाड पोलिसांनी जोरदार धाडसत्र राबविले. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी केलेल्या ५ वेगवेगळ्या कारवायांमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणल्याचे दिसून आले. या कारवायांमध्ये ऐकून ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आहे आहेत.

धामणगावात धाड पोलिसांचा धडका! अवैध दारू अन् जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाई; ५ जणांवर गुन्हे दाखल!
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे,अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात तसेच धाड ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार युवराज मुळे, कुमोद जाधव यांच्यासह अन्य पोलीस अंमलदारांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी धामणगाव परिसरात अचानक धाडी टाकल्या. या कारवाईत खालील आरोपी संतोष दगडुबा सुराशे, शिवशंकर कीसन महाले, सागर समाधान महाले, गौतम रंगनाथ मोरे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये, तर आरोपी पठाण समद इब्राहिम याच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपरोक्त कारवायांमध्ये आरोपींच्या ताब्यातून हातभट्टी दारू, देशी दारूच्या बाटल्या, जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ४ हजार ५४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध दारू निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच जुगार चालवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. येत्या काळात याविरुद्ध अशीच आक्रमक आणि प्रभावी कारवाई सुरूच राहील, असा इशारा ठाणेदार मोरे यांनी दिला आहे.