क्राईम जगत
क्रूरकर्मा बाप! तीन दिवसांच्या चिमुरडीला संपवले!

शेंदुर्णी,(प्रतिनिधी):
वर्षाला करोडो रुपये खर्ची घालून शासन स्तरावरून “लेक वाचवा” चळवळ राबवण्यात येत आहे. तर दुसरीकडे मुलगाच हवा या हट्टापायी कोवळ्या कळ्यांना कुस्करल्या जात आहे. असाच एक प्रकार नुकताच समोर आला. विकृती मानसिकतेतून एका जन्मदात्या नराधम बापाने आपल्या अवघ्या तीन दिवसांच्या मुलीची हत्या केली. राज्यभरात खळबळजनक उडवून देणारी ही संतापजनक घटना मारोड (ता. जामनेर) येथे घडली.
मोराड (ता.जामनेर) येथील रहिवासी कृष्णा लालचंद राठोड (वय २६ वर्षे) याल अगोदरच तीन मुली. त्यातच पत्नी चौथ्यांदा गरोदर राहिली. आता तरी आपल्याला मुलगा होईल, अशी कृष्णाला खात्री होती. मात्र, पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यामुळे कृष्णाची निराशा झाली. डोक्यात सैतान संचारलेल्या कृष्णाने रागाच्या भरात अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. मागचा पुढचा काहीच विचार न करता या नराधमाने अवघ्या तीन दिवसांच्या आपल्या पोटच्या मुलीच्या डोक्यात लाकडी पाटा मारून तिची निर्घृण हत्या केली.
एवढ्यावरच न थांबा मुलगी आईच्या हातातून पडल्याने तिचा मृत्यू अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव या नराधमाने रचला. आपल्या या बनवात त्याने पत्नीला सहभागी करून घेतले. त्यानुसार त्यांनी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करून घेतली. मात्र, शेंदुर्णी ओपीचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे यांना या बनावाची शंका आली. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. नातेवाईकांचे जबाब घेण्यात आले. काही वेळानंतर वैद्यकीय अहवालही प्राप्त झाला. मात्र, त्यामध्ये मोठ्याप्रमाणात तफावत आढळून आली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवालातून स्पष्ट केले. विशेष म्हणजे उंचावरून पडल्याने होणाऱ्या जखमांशी ही जखम जुळत नसल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यामुळे त्यांनी कृष्णाची कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या कृष्णाने अखेर पोलिसी खाक्या दाखवताच आपला गुन्हा कबूल केला आणि या क्रूर हत्येचे गूढ उकलले.
याप्रकरणी पहूर पोलिसांत आरोपी कृष्णा राठोड याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहेत.
सार्वभौम चिंतनाची बाब
एकीकडे आपण २१ व्या शतकात वावरत असताना आणि ‘लेक वाचवा’च्या घोषणा देत असताना, मुलाच्या हट्टापायी एका चिमुकलीचा असा अंत होणे, ही निश्चितच विचार करायला लावणारी,नव्हेतर शासन, प्रशासन, समज आणि गल्ली ते दिल्ली पुढारपण मिरवणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठी चिंतनाची बाब आहे.



