मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला इंधन तुटवडा लक्षात घेता, प्रशासनाने कॅनमध्ये पेट्रोल आणि डिझेल देण्यावर बंदी घातली आहे. मात्र, सध्या शेती मशागतीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना डिझेलअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना किमान २० लिटर डिझेल आणि सर्वसामान्य वाहनधारकांना १ लिटर पेट्रोल कॅनमध्ये उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्रहारचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे केली आहे.
तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, सध्या शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. नियमानुसार ट्रॅक्टर पंपवर नेल्याशिवाय डिझेल मिळत नाही. अशात शेतात काम करत असताना डिझेल संपल्यास, ट्रॅक्टर टोचन मारून पेट्रोल पंपापर्यंत नेण्याशिवाय पर्याय राहत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाया जात असून त्यांना नाहक शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती पाहता शेतीकामासाठी किमान २० लिटर डिझेल कॅनमध्ये नेण्याची मुभा देण्यात यावी. केवळ शेतकरीच नव्हे, तर सर्वसामान्य वाहनधारकांनाही या नियमाचा फटका बसत आहे. रस्त्यात अचानक दुचाकी किंवा चारचाकीचे पेट्रोल संपल्यास, कॅनमध्ये पेट्रोल मिळत नसल्यामुळे वाहन ढकलत किंवा ओढत न्यावे लागते. प्रवाशांची ही कुचंबणा थांबवण्यासाठी तातडीने १ लिटर पेट्रोल कॅनमध्ये देण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील अजय टप यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
