कैद्यासोबतच रंगली पोलिसांची मद्याची मैफिल!, दोन वरिष्ठ पोलीस अंमलदारांवर गुन्हा दाखल; जिल्हा कारागृहातील धक्कादायक प्रकार

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): ज्यांच्या खांद्यावर कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, ज्यांच्या वर्दीच्या दरारा गुन्हेगारांमध्ये असायला हवा, त्याच खाकीने आज पुन्हा एकदा मद्याच्या नशेत आपली इभ्रत वेशीवर टांगली आहे. बुलढाणा पोलीस दलात आज अशी एक घटना घडली आहे, ज्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका खतरनाक कैद्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्याची जबाबदारी असलेल्या दोन पोलीस अंमलदारांनी चक्क त्या कैद्यासोबतच ‘जामवर जाम’ फस्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून कर्तव्याची ऐशीतैशी करणाऱ्या या ‘महाभागां’मुळे पोलीस दलाची मान शरमेने खाली गेली आहे.

बुधवार, ६ मे २०२६ रोजी सकाळी जिल्हा कारागृह प्रशासनाने एका बंदीवानाच्या (सचिन परशुराम माने) वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस मुख्यालयाकडे दोन अंमलदारांची मागणी केली होती. त्यानुसार, पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक विकास वासुदेव तिडके यांनी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक सुभास शेळके आणि पोलीस अंमलदार प्रकाश मोरे यांची नियुक्ती केली. सकाळी ९.४० च्या सुमारास हे दोन्ही अंमलदार अत्यंत गांभीर्याने कर्तव्यावर रवाना झाले. कागदावर सर्व काही आलबेल होते, पण पुढच्या काही तासांत जे घडले ते कल्पनेपलीकडचे होते. ही घटना केवळ दोन अंमलदारांची चूक नसून ती पोलीस दलातील वाढत्या शिथिलतेचे लक्षण मानले जात आहे. आता या प्रकरणाचा तपास काय वळण घेतो आणि या ‘तळीराम’ पोलिसांना काय शिक्षा मिळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

तिघेही मद्याच्या धुंदीत

ज्या कैद्यावर नजर ठेवणे अपेक्षित होते, त्याच्यासोबतच या दोन्ही अंमलदारांची मैत्री इतकी घट्ट झाली की, त्यांनी कर्तव्याचे भान विसरून चक्क मद्यप्राशन केले. जिल्हा कारागृह प्रशासनाच्या हे लक्षात येताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कैदी आणि त्याला घेऊन जाणारे रक्षक, तिघेही मद्याच्या धुंदीत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. कारागृह अधीक्षकांनी तात्काळ या घटनेची दखल घेत लेखी पत्राद्वारे पोलीस प्रशासनाला कळवले.

वैद्यकीय अहवालात ‘नशा’ उघड

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. या दोन्ही अंमलदारांना तातडीने ताब्यात घेऊन रामराव जंवजाळ यांच्या देखरेखीखाली सामान्य रुग्णालय (बुलढाणा) येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर जो अहवाल दिला, तो पोलीस विभागासाठी चपराक देणारा होता. दोघेही अंमलदार मद्याच्या अमलाखाली असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. रक्ताचे नमुने सीलबंद करण्यात आले आहे.

खाकीची इभ्रत वेशीवर!

पोलीस मुख्यालय हे जिल्ह्याचे शिस्तीचे केंद्र मानले जाते. मात्र, त्याच मुख्यालयातील दोन वरिष्ठ अंमलदारांनी अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी आणि एका गुन्हेगारासोबत मद्यप्राशन केल्याने “कुंपणच शेत खात असेल तर दाद कोणाकडे मागायची?” असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. या घटनेमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या हजारो पोलीस कर्मचाऱ्यांची प्रतिमा मलीन झाली आहे.

गुन्हा दाखल आणि पुढील कारवाई

राखीव पोलीस निरीक्षक विकास तिडके यांच्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलिसांत उपरोक्त पोलिसांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम ८५ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रबडे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!