अजय टप
शेगाव,(प्रतिनिधी): शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या जानोरी गावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत टोळीला पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने रंगेहात पकडले आहे. या कारवाईत मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील चार आणि शेगाव येथील एक अशा एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मोटारसायकल, शस्त्रास्त्रे आणि रोख रकमेसह दीड लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास जानोरी शिवारात काही संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस अंमलदार उमेश आखरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जानोरी येथील आशुतोष बोरसे यांच्या घराजवळ, कालखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. यावेळी तिथे दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत असलेले अशपाक हुसेन इकबाल हुसेन (वय ३५ वर्षे), रा. बऱ्हाणपूर, नदीम खान कदीर खान (वय ३६ वर्षे), रा. मिल्लत नगर, शेगाव, जमील अहमद ईनामऊल्ला (वय ५२ वर्षे), रा. बऱ्हाणपूर, शरीफ अहमद शहीद अहमद (वय ३५ वर्षे), रा. बऱ्हाणपूर, आसीफ खान बाबू खान (वय ४५ वर्षे), रा. बऱ्हाणपूर हे पाच जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
यावेळी त्यांच्या ताब्यातून बजाज डिस्कव्हर एमएच-३०-एक्स-२१८० आणि होंडा युनिकॉर्न एमएच-३०-एजी-२७८१, एक लोखंडी कोयता (संतूर), स्टीलचा फोल्डिंग चाकू, ब्लेडचे पाते, ५ अँड्रॉइड मोबाईल, दोन टॉर्च, कारची चाबी, माचिस आणि १४ हजार ८२० रुपये रोख, एकुण १ लाख ५५ हजार २७० रुपये जप्त करण्यात आले.
या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिताच्या कलम ३१० (४) आणि ३१० (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लिंगाडे हे करत आहेत. या कारवाईमुळे परिसरात भीतीचे वातावरण कमी झाले असून, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे.