अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दाताळा परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. एकाच रात्री चोरट्यांनी एक किराणा दुकान आणि एका घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वाढत्या बेकायदा व्यवसायांपाठोपाठ चोरी व घरफोडीच्या घटना वाढीस लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दाताळा येथील रहिवासी गजानन मरी सातसुरे (वय ६१ वर्षे) यांचे त्यांच्या घराला लागूनच जय बजरंग प्रोव्हीजन नावाचे किराणा दुकान आहे. २६ एप्रिलच्या रात्री साडे नऊच्या सुमारास त्यांनी दुकान नीट कुलूप लावून बंद केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता त्यांची पत्नी दुकान उघडण्यासाठी गेली असता, दुकानाच्या मागील दरवाजाचा कडा कापलेला दिसून आला. चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून काऊंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली ३२ हजार रुपये रोख लंपास केली. सातसुरे हे या घटनेची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला जात असतानाच, गावातीलच गजानन रामासा भावसार यांच्या घरातही चोरी झाल्याची माहिती समोर आली. चोरट्यांनी भावसार यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सुमारे ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन पोबारा केला. एकाच रात्री झालेल्या या दोन चोऱ्यांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
मलकापूर ग्रामीण पोलिसांनी गजानन सातसुरे व गजानन भावसार यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाळू टाकरखेडे, सूर्यवंशी, सचिन दासार, संदीप राखुंडे हे करीत आहेत. गावात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता पोलीस या सराईत चोरट्यांच्या मुसक्या कधी आवळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलीस सुस्त अन् गुन्हेगार मस्त
गेल्या काही महिन्यांपासून मलकापूर तालुक्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. कोणाचेही भय नसल्यागत खुलेआम अवैध धंदे सुरु आहेत. तर दुसरीकडे चोऱ्या, घरफोड्या, हाणामाऱ्या सारख्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. सुरु असलेला नंगानाच पाहता, ‘पोलीस सुस्त अन् गुन्हेगार मस्त’, अशी खोचक प्रतिक्रीया नागरिकांमधून उमटत आहे.