अभिनय बोर्डे
धाड,(प्रतिनिधी): एकीकडे देश प्रगतीची शिखरे पादाक्रांत करत असताना, दुसरीकडे आजही समाजाला बालविवाहासारखी अनिष्ट प्रथा पोखरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मात्र, कायद्याचा वचक आणि पोलिसांची तत्परता असेल तर नियतीचा खेळ बदलता येतो, याचाच प्रत्यय जालना जिल्ह्यातील मोहळई येथे आला. एका १६ वर्षीय निष्पाप मुलीचे बालपण लग्नाच्या बेडीत अडकवण्याचा पालकांचा डाव पोलिसांनी अत्यंत धाडसी कारवाई करत उधळून लावला.
मोहळई (जि.जालना) येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावला जात असल्याची गुप्त माहिती ‘डायल ११२’ या आपत्कालीन सुविधेवर प्राप्त झाली. लग्नाचे सनई-चौघडे वाजण्याच्या तयारीत असतानाच या एका फोन कॉलने चक्र फिरली. ठाणेदार संतोष माने यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पथक रवाना करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस अंमलदार सिनकर आणि पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता मोहळई गावाकडे धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच लग्नमंडपात एकच खळबळ उडाली. केवळ पोलीसच नव्हे, तर या कारवाईत नागरी प्रशासनानेही आक्रमक पवित्रा घेतला होता. ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती बोरसे, पोलीस पाटील सुरेश पालकर, सरपंच रेणुका पालकर, जालना चाईल्ड हेल्पलाईन कार्यालयातील मंगल उगले, अंगणवाडी सेविका मंगला पानपाटील आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत संबंधित कुटुंबाला घेराव घातला. बालविवाह हा केवळ सामाजिक गुन्हा नाही, तर तो एका मुलीच्या आयुष्याशी केलेला खेळ आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा कडक इशारा यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिला.
कारवाईदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी बोरसे यांनी बालिकेच्या आई-वडिलांची चांगलीच कानउघाडणी केली. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार होणारी कठोर कारवाई, जेलची हवा आणि मुलीच्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम याचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला. नुसते बोलून न थांबता, पोलिसांनी पालकांना कायदेशीर सूचना पत्रक बजावले. ‘जर पुन्हा असा प्रयत्न झाला, तर थेट कोठडीत रवानगी होईल,’ असा सज्जड दम भरल्यानंतर पालकांचे डोळे उघडले आणि त्यांनी हा विवाह थांबवण्याचा निर्णय घेतला. बालविवाह लावणे, त्यास प्रोत्साहन देणे किंवा उपस्थित राहणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे प्रकार आढळून आल्यास कठोर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. मोहळई गावातील या धडाकेबाज कारवाईचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
विवाह रोखला, पण प्रश्न कायम!
पोलिसांच्या या तत्परतेमुळे एका मुलीचे भविष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहे. मात्र, ही घटना समाजासाठी एक चपराक आहे. १६ व्या वर्षी हातामध्ये पुस्तक असण्याऐवजी मंगळसूत्र बांधण्याची घाई का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. ठाणेदार संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही कारवाई केवळ एका लग्नापुरती मर्यादित नसून, संपूर्ण जिल्ह्यासाठी एक मोठा संदेश ठरली आहे.