अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यात कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. अवघ्या २४ तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. पहिली घटना धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत सारोळा पीर येथे घडली असून, दुसरी घटना शेगाव शहराच्या गजबजलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून घडली आहे. या दोन्ही घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहिली घटना: संडासला गेलेली १६ वर्षीय मुलगी बेपत्ता; सारोळा पीरमधील संतापजनक प्रकार
धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सारोळा पीर येथील एका १६ वर्षीय मुलीला लग्नाचे किंवा अन्य कोणत्या तरी कारणाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी (वय १६ वर्षे ३ महिने २२ दिवस) ही घरातून संडासला जाण्यासाठी निघाली होती. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. चिंताग्रस्त झालेल्या आईने तिचा शोध घेतला असता, गावातीलच आरोपी गोपाल संजय लवंगे याने तिला आपल्या मोटारसायकलवर बसवून अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी आरोपी गोपाल लवंगे विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार गजानन भराड हे करीत आहेत. एका अल्पवयीन मुलीला दिवसाढवळ्या गावातून पळवून नेल्याने ग्रामस्थांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दुसरी घटना: शेगावच्या गजबजलेल्या चौकातून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; संशयाची सुई अजय पवारवर
दुसरी घटना तीर्थक्षेत्र शेगाव शहरात घडली आहे. येथील वियोगी नगर भागातील १७ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाली.
फिर्यादी घरात झोपल्या होत्या, तर मुलगी आणि मुलगा दुसऱ्या खोलीत टीव्ही पाहत होते. काही वेळाने फिर्यादीला जाग आली असता त्यांना मुलगी घरात दिसली नाही. लहान मुलाने दिलेल्या माहितीनुसार, मुलगी त्याला घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गेली होती. तेथे ती एका ऑल्टो कारमध्ये बसून निघून गेली आणि तिने भावाला घरी जाण्यास सांगितले.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १५ दिवसांपूर्वी आरोपी अजय पवार (रा. इंदिरा नगर, शेगाव) हा पीडित मुलीशी बोलत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे अजय पवार यानेच मुलीला फुस लावून पळवून नेल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात आला आहे. शेगाव शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ग्रेड पोउपनि गावंडे यांच्याकडे तपासाची चक्रे सोपवण्यात आली आहेत.
पोलीस प्रशासनासमोर आव्हान!
एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अल्पवयीन मुलींना लक्ष बनवणारी ही टोळी आहे की वैयक्तिक गुन्हेगारी, याचा तपास होणे गरजेचे आहे. सोबतच गुन्हेगारी वृत्तीच्या नराधमांना ठेचण्यासाठी आता समाजानेही सतर्क होण्याची वेळ आली आहे. पोलीस या नराधमांना कधी बेड्या ठोकतात आणि त्या चिमुकल्या मुलींना सुरक्षित घरी आणतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.