संग्रामपूर,(प्रतिनिधी): संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील मुख्य रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटी कंपनीने शासकीय नियमांना केराची टोपली दाखवत मनमानी कारभाराचा कळस गाठला आहे. जिल्हा परिषद हायस्कूल ते आठवडी बाजार या ५०० मीटरच्या काँक्रीट रस्त्याचे काम महिनाभरातच उखडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रत्यावरील ‘डेंजरस’ स्पीड ब्रेकर आणि अर्धवट नाल्या आता नागरिकांच्या जिवावर उठल्या आहेत.

शासकीय नियमानुसार स्पीड ब्रेकरची उंची ३ ते ४ इंच आणि रुंदी ३.७ मीटर असणे आवश्यक आहे. तसेच त्यावर पांढरे-काळे पट्टे असणे अनिवार्य आहे. मात्र, पातुर्डा येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयासमोर कंत्राटदाराने सर्व नियम धाब्यावर बसवून अवाढव्य उंचीचे गतिरोधक तयार केले आहेत. या उंच गतिरोधकांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे इंजिन खालच्या बाजूने आदळत असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी हे गतिरोधक नीट दिसत नसल्याने अनेक वाहनधारक थडकून जखमी होत आहेत. हे गतिरोधक वाहन चालकांसाठी ‘डोकेदुखी’ आणि अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत.
खांडवी ते पंचगव्हाण दरम्यानच्या रस्ता सुधारण्याचे काम गेल्या ७ वर्षांपासून सुरू आहे. मात्र, पातुर्डा येथील ऑटो स्टॉप, माहेश्वरी रस्ता, बस स्थानक आणि आठवडी बाजार वळणावरील नाल्यांचे बांधकाम अद्यापही प्रलंबित आहे. काम अर्धवट सोडून पळ काढण्याचा फंडा कंत्राटी कंपनीने अवलंबला आहे का?, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. अर्धवट नाल्यांच्या ठिकाणी मोठे खड्डे पडले असून, सांडपाणी रस्त्यावर येत आहे. हे खड्डे अपघातासाठी कारणीभूत ठरत असून, सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
जनतेचा रोष: कारवाईची मागणी
पातुर्डासह कोद्री, टाकळी, पंचगव्हाण, कुंदेगाव, आवार आणि उकळी परिसरातील प्रवाशांना या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या रस्त्याची आणि नियमबाह्य स्पीड ब्रेकरची पाहणी करावी. स्पीड ब्रेकरची उंची तातडीने कमी करून त्यावर रंगकाम करावे. रखडलेल्या नाल्यांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले, तर परिसरातील संतप्त नागरिक आणि वाहनधारक तीव्र आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात आहेत.