अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यामध्ये सध्या एक अत्यंत चिंताजनक आणि भीतीदायक चित्र समोर येत आहे. गेल्या अवघ्या चार ते पाच दिवसांत जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चक्क ७ नागरिक बेपत्ता झाल्याची धक्कादायक नोंद झाली आहे. यामध्ये तरुण मुली, विवाहित महिला, लहान बालक आणि पुरुषांचा समावेश असल्याने जिल्ह्यात मानवी तस्करी किंवा एखाद्या मोठ्या टोळीचा हात तर नाही ना? असा संशयास्पद प्रश्न उपस्थित होत आहे. नांदुरा, खामगाव, जळगाव जामोद, शेगाव आणि मेहकर या पाच तालुक्यांमध्ये हे गायब होण्याचे सत्र सुरू असून, पालकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
खामगाव: १८ वर्षांची तरुणी दुकानात गेली अन् परतलीच नाही!
खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत अटाळी येथील राधिका संतोष वसतकार (१८ वर्षे ४ महिने) ही तरुणी २० एप्रिल रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास आपल्या लहान बहिणीला खाऊ आणण्यासाठी दुकानात जाते असे सांगून घराबाहेर पडली. मात्र, ती अद्याप घरी परतलेली नाही. नातेवाईक आणि परिसरात शोध घेऊनही तिचा पत्ता लागलेला नाही.
नांदुरा: ५० वर्षीय बांधकाम कामगार १० दिवसांपासून बेपत्ता!
नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीतील पिंप्री अढाव येथील धर्मा रणछोड रणित (५० वर्षे) हे ११ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. संध्याकाळी ८ वाजेपर्यंत घरी येणे अपेक्षित असताना ते अचानक गायब झाले. त्यांच्या पत्नीने सर्वत्र शोध घेतला, परंतु १० दिवस उलटूनही धर्मा रणित यांचा थांगपत्ता लागलेला नाही.
शेगाव: पोटच्या ३ वर्षांच्या चिमुकलीसह विवाहिता गायब!
शेगाव तालुक्यातील खेर्डा येथून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. अश्विनी सुनील निंबाळकर (२६ वर्षे) ही महिला आपल्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीसह (आरोही) घरात कोणालाही काहीही न सांगता अचानक निघून गेली आहे. एका तरुण आईचे आपल्या लहान मुलीसह अशा प्रकारे गायब होणे अनेक शंकांना जन्म देत आहे.
जळगाव जामोद: रात्री झोपलेली १९ वर्षांची मुलगी सकाळी गायब!
जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा बु. येथून किरण सरदार सोलंकी ही १९ वर्षीय तरुणी मध्यरात्रीच्या सुमारास बेपत्ता झाली आहे. २० एप्रिलच्या रात्री ८ वाजता ती घरीच होती, मात्र २१ एप्रिलच्या पहाटे ५ वाजता ती घरात नसल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले. ऐन तारुण्यातील मुली अशा प्रकारे गायब होत असल्याने पोलीस तपासाचे मोठे आव्हान समोर उभे ठाकले आहे.
मेहकर: पेपर द्यायला गेलेली विद्यार्थिनी कॉलेजमधूनच बेपत्ता!
मेहकर येथील सिंधूताई जाधव महिला कॉलेजमध्ये पेपर देण्यासाठी गेलेली निकीता सतीश खिल्लारे (२० वर्षे) ही तरुणी पेपर सुटल्यानंतर घरी परतलीच नाही. तिच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, तिला कॉलेजला सोडून दिल्यानंतर ती पुन्हा दिसलीच नाही. शिक्षण घेणाऱ्या तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
अपंग बांधवही सुरक्षित नाही: मुलींना आणायला गेले अन् स्वतःच बेपत्ता!
खामगाव तालुक्यातील शहापूर येथील राजरतन दिगांबर इंगोले (वय ४० वर्षे), जे पायाने अपंग आहेत, ते आपल्या मुलींना बुलढाणा येथील सुधारगृहातून आणण्यासाठी १५ एप्रिल रोजी घराबाहेर पडले होते. मात्र, ५ दिवस उलटूनही ते मुलींपर्यंत पोहोचले नाहीत आणि घरीही परतले नाहीत. एकाच वेळी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून लोक बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.