बुलढाणा जिल्ह्यात चिंतेचा पूर: चार महिन्यांत शेकडो महिला बेपत्ता; कुणी लग्नासाठी पळतंय, तर कुणी घरगुती वादातून?

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस दलातील आकडेवारी आणि दैनंदिन दाखल होणारे ‘मिसिंग’ रिपोर्ट पाहता, परिस्थिती अतिशय चिंताजनक बनली आहे. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यातून तब्बल ४०० हून अधिक महिला व मुली बेपत्ता झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, केवळ गेल्या दोन-तीन दिवसांतच चिखली, नांदुरा, तामगाव, आणि मोताळा परिसरातून पाच हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या २४ तासांत दाखल झालेले गुन्हे समाजाच्या ढासळत्या सामाजिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.
लग्नाच्या मांडवातून पत्नी बेपत्ता
नांदुरा: तालुक्यातील टाकरखेड येथील प्रविण वराडे यांची पत्नी स्वप्नाली वराडे या विवरा (ता.मलकापूर) येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेल्या होत्या. लग्नाच्या गर्दीत सकाळी १० वाजेपर्यंत त्या दिसल्या, मात्र १०.१५ ला त्यांचा फोन बंद झाला आणि त्या अचानक गायब झाल्या. एका विवाहीत महिलेचे अशा प्रकारे लग्नावरून बेपत्ता होणे संशयास्पद मानले जात आहे.
औषध आणायला गेली ती परतलीच नाही
नांदुरा: शहरातील बोंद्रे हॉस्पिटलमध्ये वडिलांसोबत गेलेली रमा महादेव इंगळे (वय २५ वर्षे) ही तरुणी मेडिकलमधून औषध घेऊन येते, असे सांगून निघाली, ती आजतागायत परतली नाही.
रात्रीच्या अंधारात घरातून पलायन
चिखली: तालुक्यातील सवना येथील १९ वर्षीय नाझिया परवीन ही तरुणी रात्री घरात झोपलेली असताना अचानक निघून गेली. सकाळी घरच्यांना ती दिसली नाही तेव्हा शोधाशोध सुरू झाली.
माहेरून मायलेकीची ताटातूट
तामगाव: पोलीस स्टेशन अंतर्गत एकलारा बानोदा येथे माहेरी आलेल्या सौ. ज्योती सिद्धार्थ क्षीरसागर (वय ३५ वर्षे) या पती आणि मुलीसह आल्या होत्या. मात्र, घरातून कुणालाही काहीही न सांगता त्या निघून गेल्या. त्यांच्या डाव्या हातावर ‘सिद्धार्थ’ असे गोंदलेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अल्पवयीन मुलीचे अपहरण
मोताळा: तालुक्यातील रोहीणखेड येथील १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून किंवा फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अक्षय राठोड नामक तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक विदारकता: कारणे काय?
जिल्ह्यात महिला बेपत्ता होण्यामागे अनेक गुंतागुंतीची कारणे समोर येत आहेत. तज्ज्ञांच्या मते आणि पोलीस तपासातील निष्कर्षांनुसार बेपत्ता होणाऱ्या मुलींमध्ये १८ ते २५ वयोगटातील तरुणींचे प्रमाण सर्वाधिक आहे. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी ओळख आणि त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून पळून जाण्याचे प्रकार घडत आहेत. तर कुठे विवाहित महिला बेपत्ता होण्यामागे सासरचा छळ किंवा पती-पत्नीमधील वाद हे मोठे कारण असल्याचे दिसते. घरगुती त्रासाला कंटाळून अनेक महिला टोकाचे पाऊल उचलतात किंवा कोणालाही न सांगता घर सोडून निघून जातात. सोबतच मजुरी करणाऱ्या कुटुंबांतील महिलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. गरिबी आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर यामुळेही कौटुंबिक संवाद कमी होत चालला असल्याचे कारणे समोर येत आहेत.
सोशल मीडियाचा ‘सापळा’
आजकाल ग्रामीण भागातही इंटरनेटचा वापर वाढला आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अल्पवयीन मुली अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात येतात. यातील अनेकजण फुस लावून मुलींना पळवून नेतात, ज्याचा परिणाम पुढे मानवी तस्करी किंवा शोषणात होण्याची भीती असते. बुलढाणा जिल्ह्यातील हे ‘मिसिंग सत्र’ कधी थांबणार? हा प्रश्न आता प्रत्येक जिल्हावासियाला सतावत आहे. प्रशासनाने आता या विषयावर केवळ गुन्हे दाखल न करता, मुळाशी जाऊन उपाययोजना करण्याची वेळ आली आहे.
पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान
एकीकडे गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान असताना, दुसरीकडे ‘मिसिंग’ प्रकरणांचा तपास लावताना पोलिसांची दमछाक होत आहे. जिल्ह्यात दररोज सरासरी ३ ते ४ महिला बेपत्ता होत असल्याची नोंद होत आहे. जरी यातील काही महिला काही दिवसांनी परतत असल्या किंवा त्यांनी लग्न केल्याचे समोर येत असले, तरी उर्वरित महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अनुत्तरितच राहतो. जिल्ह्यातील वाढती आकडेवारी पाहता पालकांनी आपल्या मुला-मुलींशी सुसंवाद साधणे गरजेचे झाले आहे. मुलगी कुठे जाते? कोणाशी बोलते? तिच्या वागण्यात काही बदल झाला आहे का? याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!