‘मणभर’ अवैध धंदे सुरू असताना प्रशासनाकडून फक्त ‘कणभर’ कारवाईचा फार्स; अन्न व औषध प्रशासनाचा नेमका निशाणा कुणावर?

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा महापूर वाहतोय, हे आता कोणापासूनही लपून राहिलेले नाही. मात्र, या छुप्या साम्राज्यावर धडक कारवाई करण्याऐवजी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन केवळ ‘किरकोळ’ विक्रेत्यांना पकडून ‘आम्ही काम करतोय’ असे चित्र रंगवत असल्याचे दिसून येत आहे. काल बोराखेडी आणि मलकापूर परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये केवळ ६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. जिल्ह्यात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असताना, ही ‘कणभर’ कारवाई म्हणजे मोठ्या माशांना वाचवण्यासाठी छोटा बळी दिला जात असल्याची चर्चा आता जनसामान्यात रंगू लागली आहे.
बोराखेडीत १,६०० रुपयांची ‘दिवाळी’!
बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शैलपूर बुद्रुक येथे अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी छापा टाकला. या छाप्यात आरोपी अरुण मोतीलाल जैस्वाल याच्याकडून विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचे काही पॅकेट्स जप्त करण्यात आले. गंमत म्हणजे, या संपूर्ण कारवाईत जप्त केलेल्या मालाची किंमत अवघी १,६०४ रुपये इतकी आहे. ज्या गावात गुटख्याच्या पुड्या घराघरात पोहोचल्या आहेत, तिथे पोलीस आणि प्रशासनाला फक्त दीड हजाराचा माल सापडणे, हे कोडे सामान्य नागरिकांना सुटेनासे झाले आहे. या प्रकरणी कलम २२३, २७४, २७५ बीएनएससह अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापुरात ४,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
दुसरीकडे मलकापूर शहरात दत्त मंदिराजवळ राहणाऱ्या वैभव भास्कर चौधरी याच्या घरावर छापा टाकण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत केसरयुक्त विमल पान मसाला आणि व्ही-०१ तंबाखूचे काही पाकीट मिळून आले. या मालाची एकूण किंमत ४,६५६ रुपये आहे. मलकापूरसारख्या मोठ्या बाजारपेठेत, जिथे गुटख्याचे ट्रक्स रिकामे होतात, तिथे अवघ्या साडेचार हजारांची कारवाई करून प्रशासन नेमका काय संदेश देऊ पाहत आहे?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाची ‘आळीमिळी गुपचिळी’?
जिल्ह्यातील अवैध गुटखा व्यवसायाचे जाळे इतके खोलवर पसरले आहे की, मुख्य वितरक राजरोसपणे आपले नेटवर्क चालवत आहेत. मात्र, कारवाईचा बडगा नेहमीच अशा किरकोळ विक्रेत्यांवर किंवा ‘पाहुण्यां’वर पडतो ज्यांच्याकडे काही पाकीट माल असतो.
हे प्रश्न अनुत्तरितच
अवघ्या एक-दोन हजाराचा माल विकणाऱ्यांकडे हा माल येतो कुठून? त्यांच्या मूळ अड्ड्यापर्यंत प्रशासन का पोहोचत नाही?, ६ हजार रुपयांच्या कारवाईसाठी इतका मोठा फौजफाटा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम गुंतवणे, हा निव्वळ वेळेचा अपव्यय नाही का?, मणभर माल गोदामांमध्ये पडून असताना, प्रशासनाला केवळ ‘कणभर’ साठाच का दिसतो?, हे प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे.
कायद्याचा धाक उरलाय का?
कारवाईत सातत्य आणि खोली नसल्याने गुटखा माफियांचे धाबे दणाणण्याऐवजी ते अधिक निर्धास्त झाले आहेत. बोराखेडीत पीएसआय कपले आणि मलकापुरात सपोनि कोळासे या प्रकरणांचा तपास करत आहेत. आता या तपासात केवळ या छोट्या आरोपींपर्यंतच पोलीस थांबतात की यामागील मोठ्या ‘किंगपिन’चा पर्दाफाश करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!