मलकापूर हादरले: स्टेथोस्कोपच्या मागे दडलेले अनैतिकतेचे ‘स्पंदनं’!;पांढरपेशी दुनियेतील ‘काळे’ सत्य

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): शहरातील ज्या भागाला आपण ‘पॉश’ म्हणतो, जिथे मोठ्या नामांकित डॉक्टरांचे फलक झळकतात आणि जिथे ‘उच्चभ्रू’ संस्कृतीचा टेंभा मिरवला जातो, त्याच गजबजलेल्या परिसरात सध्या एक वेगळाच ‘हाय-प्रोफाईल’ ड्रामा रंगला आहे. रुग्णसेवा करणाऱ्या हातांनी जेव्हा नैतिकतेची मर्यादा ओलांडली, तेव्हा चर्चा तर होणारच! एका प्रतिष्ठित डॉक्टरचे दुसऱ्या एका डॉक्टरांच्या कौटुंबिक वर्तुळातील व्यक्तीशी जुळलेले ‘सूत’ आता मलकापूरच्या चौकाचौकात चर्चेचा विषय ठरले असून, यामुळे तथाकथित उच्चभ्रू वस्तीतील सभ्यतेचा बुरखा पार फाटला आहे.

मलकापूरमधील एका नामांकित आणि विवाहित डॉक्टरांचे प्रेमप्रकरण दुसऱ्या एका डॉक्टर कुटुंबाशी संबंधित असलेल्या व्यक्तीसोबत गेल्या काही दिवसांपासून गुपचूप सुरू होते. पांढऱ्या कोटाच्या आड लपलेला हा ‘काळाबाजार’ अखेर घरच्यांच्या समोर आला आणि मग जे घडले, त्याने या उच्चभ्रू वस्तीची शांतता भंग केली. ही बाब समोर येताच संबंधित कुटुंबांमध्ये इतका तीव्र वाद झाला की, त्याचे पडसाद आता घराच्या चार भिंती ओलांडून रस्त्यावर आले आहेत. काही ठिकाणी यावरून मोठा राडा झाल्याचीही कुजबुज असून, प्रतिष्ठेच्या नावाने गळा काढणाऱ्या या वर्तुळात आता एकमेकांकडे बघण्याचीही सोय उरलेली नाही.

समाज ज्यांना आदर्श मानतो, ज्यांच्याकडे आदराने पाहतो, त्यांच्याच खासगी आयुष्यात जेव्हा असा गोंधळ उडतो, तेव्हा सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होणे स्वाभाविक आहे. सामाजिक जबाबदारी कुठे गेली?, ज्या डॉक्टरांवर समाजाच्या आरोग्याची जबाबदारी आहे, त्यांनी स्वतःच्या नैतिक आरोग्याकडे दुर्लक्ष का करावे?, गोपनीयतेचा पडदा की पापाचा पांघरूण? हे प्रकरण खासगी असल्याचे सांगितले जात असले तरी, जेव्हा एखादी कृती समाजातील शांतता बिघडवते, तेव्हा ती वैयक्तिक उरत नाही. एसी केबिन आणि आलिशान बंगल्यांच्या आत चालणारे हे प्रकार म्हणजे ‘सभ्य’ समाजाचा खरा चेहरा आहे का?, असे महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

शहरात तर्क-वितर्कांना उधाण

मलकापूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या प्रकरणाची खुसखुशीत चर्चा सुरू आहे. “एवढं मोठं नाव असूनही हे कृत्य केलं कसं?” असा सवाल सामान्यांमधून विचारला जात आहे. अधिकृत स्तरावर यावर अद्याप कोणीही बोलायला तयार नाही, मात्र ‘आग लागल्याशिवाय धूर निघत नाही’ या म्हणीप्रमाणे या प्रकरणाचे गांभीर्य दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे, यात अडकलेली दोन्ही कुटुंबे ही शहरातील प्रतिष्ठित आणि प्रभावशाली असल्याने हे प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पद मोठे, पण विचार छोटे!

शिक्षण आणि पैसा माणसाला सुख-सुविधा देऊ शकतो, पण संस्कार आणि नैतिकता विकत घेऊ शकत नाही, हेच या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. रुग्णांच्या नाड्या तपासणाऱ्यांनी स्वतःच्या मनाच्या नाड्या जर वेळीच तपासल्या असत्या, तर आज ही नाचक्की ओढवली नसती. ज्यांच्या घरावर ‘सुस्वागतम’च्या पाट्या आहेत, त्यांच्याच घराची तावदाने आता लोकांच्या चर्चेच्या धोंड्यांमुळे फुटू लागली आहेत. हे प्रकरण केवळ ‘कुजबुज’ म्हणूनच राहणार की यातून कायदेशीर किंवा सामाजिक संघर्षाचे नवे वळण समोर येणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अशा घटनांमुळे तरुण पिढीसमोर कोणता आदर्श ठेवला जात आहे, हा कळीचा मुद्दा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!