https://hindvarta.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Image-2026-04-29-at-10.50.45-AM.jpeg

लग्न होत नसल्याच्या विवंचनेत तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून आणि दारूच्या नशेत एका २२ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना मलकापूर तालुक्यातील माकनेर शिवारात घडली आहे. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केशव बाबुराव वनारे (वय २२ वर्षे) रा. माकनेर (ता.मलकापूर) हा तरुण गेल्या काही दिवसांपासून लग्नासाठी प्रयत्न करत होता. मात्र, अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही त्याचे लग्न जुळत नसल्याने तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. याच विवंचनेत त्याने २९ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत माकनेर शिवारातील एका विहिरीत उडी घेतली. पाण्यात बुडाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मृताचे चुलत काका विश्वास मधुकर वनारे (वय ४५ वर्षे) रा. माकनेर यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. फिर्यादीनुसार, केशवचे लग्न होत नसल्याने तो सतत काळजीत असायचा आणि याच कारणावरून त्याने टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार बाळू टाकरखेडे हे करीत आहेत. अवघ्या २२ वर्षांच्या तरुणाने अशा प्रकारे आपले जीवन संपवल्याने माकनेर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लग्न न जमणे यासारख्या कारणावरून तरुणांमध्ये वाढत असलेले नैराश्य आणि व्यसनाधीनता आता चिंतेचा विषय बनली आहे. पोलिसांनी मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून, अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!