संग्रामपूर,(प्रतिनिधी): शासकीय निर्णयांची अंमलबजावणी करण्यात प्रशासनाकडून होणारा विलंब सामान्य नागरिकांच्या मुळावर कसा येतो, याचे जिवंत उदाहरण संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे पाहायला मिळत आहे. येथील पंचशील नगरमधील रहिवाशांनी आपल्या घरांच्या आणि जागेच्या नियमितीकरणासाठी आता आरपारची लढाई लढण्याचा पवित्रा घेतला असून, येत्या १० दिवसांत प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण आणि जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सोनाळा येथील पंचशील नगर परिसरात नागरिक गेल्या ५० ते ६० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार (जीआर), या भागातील घरांचे आणि जागांचे नियमन करणे अनिवार्य आहे. मात्र, शासन निर्णय होऊनही स्थानिक प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाच्या या “कासवगती” कारभारामुळे येथील नागरिक आजही आपल्या हक्काच्या मालकी हक्कापासून वंचित आहेत.
जागांचे नियमितीकरण न झाल्यामुळे या वस्तीतील नागरिकांना अनेक मूलभूत सुविधा मिळवण्यात अडचणी येत आहेत. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होत असून, कायदेशीर संरक्षणाअभावी नागरिक असुरक्षित वाटत आहेत. प्रशासकीय निष्क्रियतेमुळे पिढ्यानपिढ्या तिथे राहणाऱ्या नागरिकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात असून रहिवाशांच्या वतीने तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, जर १० दिवसांच्या आत या प्रकरणाची दखल घेऊन नियमितीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर पंचशील नगरमधील सर्व नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन करतील. या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा गर्भित इशाराही प्रहार सेवक आकाश वानखडे यांनी निवेदनात दिला आहे.