क्राईम जगत
सावधान! बुलढाण्याच्या निर्जन टेकड्यांवर ‘नराधमांचा’ पहारा

बुलढाणा,(प्रतिनिधी): मैत्री असो वा प्रेम, दोन जीवांना हवी असते ती फक्त हक्काची दोन क्षण शांतता! याच शांततेच्या आणि एकांतवासाच्या शोधात निसर्गरम्य डोंगरदऱ्यांकडे धाव घेणाऱ्या प्रेमी युगुलांना आता टवाळखोरांच्या आणि विकृत मानसिकतेच्या ‘नजरेचा’ सामना करावा लागत आहे. बुलढाणा शहरातील उच्चभ्रू वस्तीतील एका जोडप्याला जामठी परिसरातील जंगलात अशाच एका थराराला सामोरे जावे लागले. तासभर चाललेला तो मानसिक छळ आणि महिलेची झालेली छेडछाड यामुळे निर्जन स्थळी जाणे किती अंगाशी येऊ शकते, याचा जळजळीत अनुभव या जोडप्याला आला आहे.
शहरातील एका नामांकित वस्तीत राहणारे हे जोडपे नुकतेच जामठी (ता. बुलढाणा) परिसरातील डोंगररांगांमध्ये फिरण्यासाठी गेले होते. निसर्गाच्या सानिध्यात डोंगरभ्रमंती आटोपल्यानंतर, हे जोडपे एका निर्जन ठिकाणी निवांत गप्पा मारत बसले होते. मात्र, याच वेळी परिसरात ‘शिकार’ शोधत फिरणाऱ्या दोन विकृतांची नजर या जोडप्यावर पडली. आणि त्या दोन जोडगड्यांनी या जोडप्याला गाठले आणि विनाकारण त्यांची उलटतपासणी सुरू केली. “येथे का बसलात?”, “घरी माहित आहे का?” अशा प्रश्नांचा भडिमार करत तब्बल तासभर या जोडप्याला मानसिक विळख्यात ओढले. एवढ्यावरच न थांबता, त्या नराधमांनी महिलेची छेड काढण्यास सुरुवात केली. जेव्हा तिच्या मित्राने याला विरोध केला, तेव्हा त्याला मारहाणीच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. आपल्या कुटुंबाला न सांगता बाहेर पडल्यामुळे हे जोडपे पूर्णपणे हतबल झालेले असल्याने,तसेच समाजात बदनामी होईल, या भीतीने त्यांनी निमूटपणे त्रास सहन केला. अखेर कसेबसे स्वतःला सावरून हे जोडपे त्यांच्या तावडीतून सुटले आणि घराकडे परतले.
निर्जन टेकड्या गुन्हेगारांचा अड्डे
शहरालगतच्या निर्जन टेकड्या आता ‘मजनू’गिरीचे नाही, तर ‘गुन्हेगारांचे’ अड्डे बनत आहेत. प्रेमी युगुले अशा ठिकाणी गेले की, ही लोकं पोलिसांपर्यंत जाणार नाहीत, हे त्यांना ठाऊक असते. म्हणूनच त्यांच्याकडून याचा फायदा उचलल्या जातो. त्यामुळे सुरक्षेचा विचार न करता अशा निर्जन ठिकाणी जाणे म्हणजे स्वतःहून संकटाना निमंत्रण देणे होय.



