चिखली, (प्रतिनिधी) : पुणे येथे २ ते ५ जानेवारी दरम्यान होऊ घातलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलमध्ये जिजाऊंच्या लेकींची निवड झाली असून ही जिल्हावासियांसाठी गौरवास्पद बाब आहे.
काव्य सादरीकरणासाठी देशभरातून अनेक फुलेप्रेमी कवी, साहित्यिक या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहे. आपल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या तथा पुणे महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ.कांचन किशोर शिंदे तसेच तांदुळवाडी येथील नम्रता आबाराव रिंढे यांची देखील या फेस्टिव्हलमध्ये निवड करण्यात आली आहे. यातील डॉ. कांचन शिंदे यांनी नुकताच सह्याद्रीरत्न पुरस्कार प्राप्त केला आहे,हे विशेष.
कमी वयातही कर्तृत्ववान युवा साहित्यिक म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही जिजाऊंच्या लेकींना या भव्य व्यासपीठावर अध्यक्षपद भूषवण्याची संधी प्राप्त झालेली आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन फुलेप्रेमी संविधानदूत प्रा.विजय वडवेवार यांनी केले आहे.