धाड,(प्रतिनिधी) :
काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या शेतकरी बापाची गरिबी हटवण्यासाठी रात्रंदिवस रक्ताचे पाणी करणाऱ्या कष्टाळू “विठ्ठल” (ता.जि.बुलढाणा) याच्यावर काळाने झडप घातली आहे. आज २५ डिसेंबरच्या पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास समृद्धी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे धाड परिसरासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
सावळी येथील रहिवाशी असलेला विठ्ठल पाटीलबा वाघ (वय ४० वर्षे) यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडिलांच्या नावावर असलेल्या तीन एकर शेतीमध्ये तीन भावांचा हिस्सा. विठ्ठल यांच्या वाट्याला केवळ एक एकर शेती. एवढ्या कमी जमिनीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य असल्याने, त्यांनी मोठ्या हिंमतीने खाजगी कंपनीकडून कर्ज काढून एमएच–०४—जेके-९४१६ क्रमांकाची आयशर गाडी घेतली होती. शेतीला जोडधंदा म्हणून ते वाहतुकीचा व्यवसाय करून प्रामाणिकपणे आपल्या संसाराचा गाडा ओढत होते.
२४ डिसेंबर रोजी विठ्ठल कोपरगाव येथून रिकाम्या बाटल्यांचे भाडे घेऊन नागपूरच्या दिशेने निघाला. २५ डिसेंबरच्या पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास कारंजा लाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टोल नाक्यापासून १५ किमी अलीकडे विठ्ठलने आपली गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि गाडीच्या टायरमधील हवा तपासण्यासाठी तो खाली उतरला. मात्र, त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एमएच-१४-एचयू-७३९५ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने विठ्ठलला जोरदार धडक दिली. दोन वाहनांच्या मध्ये चिरडल्या गेल्याने विठ्ठलचा जागीच अंत झाला. या अपघातात धडक देणाऱ्या वाहनाचा चालक संतोषसिंग याचाही मृत्यू झाला असून सहचालक अनिकेत सिंग गंभीर जखमी झाला आहे.
बुलढाणा तालुक्यात हळहळ
विठ्ठल वाघ हा केवळ एक चालक नव्हता तर तो एक संवेदनशील सामाजिक आणि धार्मिक कार्यकर्ता देखील होता. समाजातील प्रत्येक घटकासोबत त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सदा मदतीला धावून जाणारा माणूस, अशी त्याची ओळख होती. त्यांच्या अशा अचानक जाण्याने एका कष्टकरी कुटुंबाचा आधार तर हिरावलाच आहे, पण समाजाचीही मोठी हानी झाली आहे. विठ्ठलच्या पश्चात वृद्ध माता-पिता, पत्नी आणि मुले असा परिवार असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांचा टाईमपास
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आवश्यक ती मदत देखील केली. मात्र, कारंजा लाड ग्रामीण पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ करून विठ्ठलच्या नातेवाईकांची हेळसांड केली. सकाळी साडेसात वाजता फिर्याद देण्यासाठी पोहोचलेल्या विठ्ठलच्या नातेवाईकांची फिर्याद सकाळी ११ वाजता पर्यंत दाखल केली नाही. पोलीस स्टेशनला असलेल्या अंमलदारांसह अधिकाऱ्यांनी देखील माझी नाही,त्याची ड्युटी असल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केल्याने विठ्ठलच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला.