
चिखली,(प्रतिनिधी) : काटा (जि.लातूर) येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वस्तीगृहात इयत्ता सहावीत शिकणाऱ्या निरागस अनुष्का पाटोळे (वय १२ वर्षे) हिचा ३ जानेवारीच्या रात्री संशयास्पद मृत्यू झाला.या घटनेमुळे संपूर्ण समाजमनाला हादरून गेले. झालेला मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नसले, तरी प्रकरणातील सत्य शोधून काढत दोषींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच अनुष्काला न्याय मिळावा, या मागणीसाठी चिखली तालुक्यातील सकल मातंग समाजातर्फे आज ९ जानेवारी रोजी चिखलीत कॅन्डल मार्च पार काढण्यात आला.

कॅन्डल मार्चमध्ये हातात मेणबत्ती घेऊन शेकडो महिला व पुरुष सहभागी होत घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध केला. शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कॅन्डल मार्चला सुरुवात झाली. सम्राट अशोक, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून हा कॅन्डल मार्च पोलीस लाईन,सिंधी कॉलनी चौक, अंजली टॉकीज मार्गे फुले–शाहू–आंबेडकर चौकात पोहोचल्यानंतर या ठिकाणी समारोप करण्यात आला. अशोका वाटिकेतील समारोपीय कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अत्यंत तीव्र शब्दांत घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ नेते कैलासराव खंडारे यांनी अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत राज्यकर्त्यांना महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. युवा नेते छोटू कांबळे यांनी भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी गुन्हेगारांना कठोर शासन करण्याची मागणी केली. यावेळी ज्येष्ठ ॲड.राजीव जाधव, गवई, मिलिंद मघाडे, प्रवीण कांबळे, सचिन कांबळे, किरण बोरकर, योगेश साळवे, विलास घोरपडे, विलास निकाळजे यांनीही तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
कोणतीही घोषणाबाजी न करता अत्यंत शांत, शिस्तबद्ध व सौहार्दपूर्ण वातावरणात हा कॅन्डल मार्च पार पडला. यावेळी समाजबांधव, शहरातील नागरिक, सामाजिक संघटना व न्यायप्रिय लोकांनी मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत अनुष्काला न्याय मिळावा, अशी एकमुखी मागणी केली, हे विशेष!



