न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकवण्याची जबाबदारी वकिलांवर:ॲड.साहेबराव मोरे

मलकापूर प्रतिनिधी : माननीय न्यायमूर्तींनी वकिलांना केलेले आवाहन हे प्रत्येक वकील बंधूसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत ॲड. साहेबराव मोरे यांनी व्यक्त केले.
सध्या समाजामध्ये न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास हळूहळू कमी होताना दिसत आहे, ही गंभीर बाब असून अशा परिस्थितीत वकिलांची भूमिका अधिक जबाबदारीची ठरते, असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, वकिलांनी कोणत्याही दबावाला न जुमानता निर्भयपणे सत्य न्यायालयासमोर मांडले पाहिजे. कारण ज्या दिवशी जनतेचा न्यायालयावरचा विश्वास पूर्णतः संपतो, त्या दिवशी जनता रक्तरंजित क्रांती करण्यासही मागे-पुढे पाहत नाही. याचे उदाहरण म्हणून त्यांनी नेपाळ व बांगलादेश या देशांचा उल्लेख केला.
समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी वकिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून ती प्रामाणिकपणे पार पाडणे ही काळाची गरज आहे, असेही ॲड. मोरे यांनी स्पष्ट केले.



