स्मार्ट बुलढाणा

धाडमध्ये खळबळ आणि मलकापूरला हादरा! पोलिसांची “ती”कारवाई आयकर विभागाच्या ‘रडावरवर’!

एक एक रुपयांचा द्यावा लागणार हिशोब

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): पोलिसांची नाकाबंदी कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहारांचे धागेदोरे उघड करते, तेव्हा प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडविल्याशिवाय राहत नाही. मलकापूर शहर पोलिसांच्या अशाच कारवाईने जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी १७ जानेवारीच्या मध्यरात्री मलकापूरच्या तहसील चौकात धडाकेबाज कामगिरी करत पकडलेली रोकड म्हणजे अवैध मार्गाने होणाऱ्या पैशांच्या प्रवासावर केलेला प्रहार आहे. ४६ लाख ७८ हजार ८५० रुपयांची जप्त करण्यात आलेली ही रक्कम आता आयकर आणि जीएसटी विभागाच्या रडारवर आली आहे.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनात मलकापूर शहर पोलीस १७ जानेवारी २०२६ च्या रात्री ‘हाय अलर्ट’वर होते. उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या नाकाबंदीत दोन आलिशान कारमधून ४६.७८ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम पाहून पोलीसही चक्रावून गेले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड कारच्या डिक्कीत लपवून नेणे, हे केवळ व्यावसायिक व्यवहार असू शकत नाहीत, असा संशय बळावत आहे. यातील एक जण धाड (बुलढाणा) येथील असून एका प्रतिष्ठित घराण्याशी संबंधित आहे. हे घराणे व्यावसायिक असले तरी, मध्य प्रदेशात कशाचा व्यवहार केला,हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे ही रक्कम मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात का आणली जात होती?, या पैशांचा स्रोत काय? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रात्रीच्या अंधारात हा प्रवास कोणासाठी सुरू होता? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता यंत्रणांनी चांगलीच कंबर कसली आहे. पोलिसांनी जप्त केलेली रक्कम जिल्हा कोषागार कार्यालय (बुलढाणा) यांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.
मलकापूर शहरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश गिरी हे केवळ रक्कम जप्त करून थांबले नाहीत, तर त्यांनी तातडीने पुढील पावले देखील उचलली असून त्यांनी आयकर अधिकारी कार्यालय (अकोला), असिस्टंट डायरेक्टर, आयकर विभाग (अमरावती), सहायक आयुक्त, जीएसटी विभाग (खामगाव) या विभागाकडे अधिकृत पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे या रक्कमेच्या मालकांना आता प्रत्येक रुपयाचा हिशोब द्यावा लागणार आहे. मालक हिशोब देऊ न शकल्यास त्यांच्या मानवेर बेनामी मालमत्ता कायद्यांतर्गत कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.
ठाणेदार गणेश गिरी, पोउनि प्रशांत झेडगे, पोलीस अंमलदार तायडे, पोलीस स्टाफ आणि आरसीपी पथकाने नाकाबंदीत केवळ गाड्या तपासल्या जात नाहीत, तर समाजातील ‘गुन्हेगारी प्रवृत्ती’ आणि ‘आर्थिक गैरव्यवहारांच्या’ चाकालाही ब्रेक लावला जातो, हे केलेल्या कारवाईतून सिद्ध केले आहे. नागरिकांच्या मनात पोलिसांप्रती विश्वास वाढीस लागण्यास ही कारवाई मोठी भुमिका बजावणार आहे, एवढे मात्र खरे!

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!