शेतशीवार

देऊळगाव राजात कापसाला हंगामातील उच्चांकी भाव 

देऊळगाव राजा, (प्रतिनिधी): कापसाच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापासून कापसाचे भाव वधारले आहेत. विदर्भातील कापसाची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला उच्चांकी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बाजार समितीत १७ जानेवारी रोजी कापसाला प्रतिक्टिंटल ८ हजार ५०० रुपये इतका दर मिळाला आहे. यंदाच्या हंगामातील हा उच्चांकी भाव असल्याचे मानले जाते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आता कापूस विक्रीवर भर दिला आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२१-२२ मध्ये कापसाला १० ते १२ हजारांपर्यंत भाव मिळाला होता. यंदाही कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेने मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. मात्र, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात हजारो हेक्टरवरील कापसाचे पीक उद्ध्वस्त झाले.

उरल्यासुरल्या आशेवर बाजारभावाने पाणी फेरले. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यंदाही कापसाच्या दरात थोडी सुधारणा झाली. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे केंद्र सरकारने कापसाची किमान आधारभूत किंमत आठ हजारांच्या जवळपास निश्चित केली.

या एमएसपीवर शेतकऱ्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. एवढ्या रकमेवर कापसाचा खर्चही व्यवस्थित निघत नाही. किमान कापसाला १० ते १२ हजार रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, असा सूर शेतकऱ्यांमधून निघत आहेत. दरम्यान, उशीरा का होईना, पण आता कापसाचे दर वाढले आहेत. कापसाला प्रतिक्विंटल आठ हजारांपेक्षा अधिक भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीाच्या माध्यमातून जास्तीत जास्त दर मिळावा, शेतकऱ्यांना जास्त त्रास होऊ नये, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सोयी सुविधा पुरविण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सभापती समाधान शिंगणे व संचालक मंडळाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यावर्षी जवळपास दोन लाख तीस हजार क्विंटलहून अधिक कापसाची खरेदी झाली आहे.

बळीराजाला धीर देण्याचे काम

गेल्या काही वर्षांपासून बळीराजा आसमानी आणी सुलतानी संकटाचा सामना करत आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव नसल्यामुळे उत्पादनापेक्षा उत्पादन खर्च अधिक वाढला आहे. आपल्या परिसरातील बळीराजाला धीर देण्याचे काम बाजार समितीच्या माध्यमातून होत आहे. बळीराजासाठी सभापती समाधान शिंगणे यांच्या माध्यमातून वेळोवेळी विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. दररोज सचिव किशोर मस्के संचालकाच्या माध्यमातून बाजार समितीतील शेतमालाचे भाव दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून गावागावात पोहोचल्या जात आहेत. शेतकऱ्यांना दररोज भाव वाढीची तेजी-मंदी कळत असल्यामुळे ज्या दिवशी शेतमालाला योग्य दर मिळेल त्या दिवशी शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत नेत आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!