स्मार्ट बुलढाणा

काय? साक्षात “यमराजा”चे दर्शन! मलकापूर-चिखली राज्यमार्गाची दुरवस्था

वाहनधारकांसह प्रवाशांचा जीव टांगणीला, बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): मलकापूर ते चिखली जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक १७६ अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास म्हणजे साक्षात यमराजाची भेटच. शासनाने ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी आणि नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून या रस्त्याचे दुपदरीकरण केले. मात्र, सबंधित यंत्रणेने या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. परिणामी, रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
रस्ता बांधकाम करताना महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या साईड पट्ट्यांमध्ये भराव टाकणे अत्यावश्यक होते. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून या पट्ट्या जशाच्या तशाच उघड्या अवस्थेत पडून आहे. रस्त्याची उंची आणि कडेला असलेला खड्डा यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्याखाली उतरवताना अपघात होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या कडा एवढ्या धोकादायक झाल्या आहेत की, समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना वाहन थेट खड्ड्यात जातात, अशी परिस्थिती आहे. यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे लहान-मोठ्या अपघातांची मालिका या रस्त्यावर ठरलेली असून एखाद्या मोठ्या जीवितहानीची शक्यताही नाकारता येत नाही.
सद्यस्थितीत रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात रानटी झाडे आणि झुडपे वाढली असून नियमानुसार ही झुडपे वेळोवेळी कापून रस्ता मोकळा करणे कंत्राटदाराची जबाबदारी असते. मात्र, याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे वळण रस्त्यावर समोरून येणारे वाहन दिसत नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे, वाहनधारकांच्या सोयीसाठी लावलेले दिशादर्शक फलक आणि किलोमीटरचे दगडही या झाडाझुडपांमध्ये गाडले गेलेले आहेत. अनोळखी प्रवाशांना तर पुढील गाव किती अंतरावर आहे किंवा नेमके वळण कुठे आहे, याचा अंदाज लावणे देखील कठीण आहे.
देखभालीची जबाबदारी कोणाची?
मलकापूर ते बुलढाणा आणि पुढे चिखलीपर्यंतच्या या मार्गाची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी बुलडाणा अर्बनकडे आहे. त्यांच्याकडून नियमित रस्ते कर वसूल केला जात आहे.मात्र, दुसरीकडे प्रवाशांना साध्या सोयीसुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवणे, साईड पट्ट्या भरणे आणि फलक सुस्थितीत ठेवणे ही कंत्राटदाराची प्राथमिक कर्तव्ये असताना त्यांच्याकडून कसूर होत असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तथा कंत्राटदाराने केवळ टोल वसुलीवर लक्ष न देता, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी जनतेतून होत आहे. या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदाराविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी दिला आहे. प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!