राजकारण

काँग्रेसमध्ये नेतृत्वाला आव्हान! ‘स्वीकृत’ सदस्यपदावरून निष्ठावानांचा संताप

दिल्लीतील इंदिरा भवनसमोर करणार उपोषण

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): सत्तेच्या राजकारणात निर्णय वरच्या पातळीवर घेतले जातात, मात्र त्याचे पडसाद तळागाळात उमटतात. कधी कधी हे पडसाद असंतोषाच्या ज्वालामुखीचे रूप धारण करतात. मलकापूर शहरात काँग्रेस पक्षांतर्गत असाच एक असंतोषाचा ज्वालामुखी धगधगत असल्याचे दिसून येत आहे. नव्हेतर नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीत झालेल्या कथित अन्यायाविरोधात काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी पार पडलेल्या निर्धार सभेच्या माध्यमातून थेट पक्ष नेतृत्वाला दिल्लीस्थित इंदिरा भवनासमोर उपोषणास बसण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. त्यामुळे मलकापूरच्या राजकारणात हडकंप उडाला आहे.
काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची निर्धार सभा १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पार पडली. या सभेचे खास वैशिष्ट्य ठरले ते कोणत्याही स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना अथवा सत्ताकेंद्रातील व्यक्तींना जाणीवपूर्वक दूर ठेवत, केवळ प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मांडलेली प्रामाणिक भूमिका. हा केवळ एक मेळावा नाहीतर, पक्षांतर्गत नाराजीचा उघड जाहीरनामा ठरला.
नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीच्या प्रक्रियेत अन्याय झाल्याचा ठपका ठेवत सभेत उपस्थित कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष अतिक जवारीवाले यांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली. राजेंद्र वानखेडे, मनोज सोने, सिद्धांत इंगळे, ईश्वर भदाले यांच्यासह स्वीकृत नगरसेवक पात्रता यादीतील विनय काळे, फिरोज खान, अफसर खान व अनिल मुंधोकार यांनी हा अन्याय केवळ व्यक्तींवर नाही, तर संपूर्ण पक्षाच्या निष्ठेवर असल्याचे मनोगत व्यक्त केले. एवढ्यावरच न थांबता कार्यकर्त्यांचा रोष अधिक तीव्र झाल्याने त्यांनी ‘जोपर्यंत या प्रकरणात नगराध्यक्षांवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही पक्षाचे कोणतेही संघटनात्मक काम करणार नाही,’ असा ठाम निर्धार जाहीर करत नियोजित संघर्षाचा इशारा दिला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी तातडीने दखल न घेतल्यास थेट दिल्ली गाठून इंदिरा भवन येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्धारही यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे हा विषय आता स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावर नेण्याची तयारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मलकापूर तालुक्यातील ग्रामीण काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील शहरात जसा प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाला, तसाच अन्याय भविष्यात ग्रामीण भागात होऊ नये. उमेदवारी देताना निष्ठा, काम आणि विश्वास या निकषांवर प्रत्येक कार्यकर्त्याला संधी देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी यावेळी केली.
जवळपास १५० हून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेली ही निर्धार सभा काँग्रेससाठी केवळ इशारा नसून, अंतर्गत संघटनात्मक धोक्याची घंटा मानली जात आहे. पक्ष नेतृत्व या असंतोषावर मलमपट्टी करते की ठोस निर्णय घेऊन निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय देते यावरच मलकापूरमधील काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे. आता पक्षश्रेष्ठी काय कारवाई करते, याकडे सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!