क्राईम जगत

विश्वासघात : पतीचे विवाहबाह्य अन् तेही “समलैंगिक” संबंध

छत्रपती संभाजीनगरमधील घटना: छावणी पोलिसांत दहा जणांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी) : आपल्या भारतीय संस्कृतीत “लग्न” म्हणजे दोन जीवांची आणि दोन कुटुंबांची रेशीमगाठ मानली जाते. विश्वासाच्या पायावर उभी राहणारी ही नाती खोट्या माहितीवर जोडल्या गेली, हे जेव्हा समोर येते, तेव्हा त्याचे परिणाम किती भयंकर घडू शकतात, याचा प्रत्यय नुकताच छत्रपती संभाजीनगरमध्ये आला. आपला पती “समलैंगिक” असून त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे कळाल्यानंतर एका विवाहितेच्या आयुष्यात आलेले वादळ सुन्न करून सोडणारे आहे.
शहरातील रहिवासी असलेल्या एका ३२ वर्षीय तरुणीचे लग्न २० मे २०२५ रोजी “गणेश” नावाच्या तरुणाशी मोठ्या थाटामाटात पार पडले. पवित्र अग्निदेवतेला साक्षी ठेऊन सात जन्म सोबत राहण्याचे वचनही एकमेकांना दिले.सुखी संसाराची नवी स्वप्ने उराशी बाळगून तिने आपल्या सासरी पाऊल ठेवले. मात्र, लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच पतीचे वर्तन तिला संशयास्पद वाटू लागले. आज,उद्या बदल होईल,मलाही सांसारिक जीवनाचा आनंद घेता येईल,अशी भाबडी आशा लागून असलेल्या तरुणीने अखेर एकेदिवशी मिठी हिंमत करून आपल्या पतीला “लग्नाला खूप दिवस झाले, आतातरी शरीरसंबंध ठेऊ”, अशी विचारणा केली. मात्र, गणेशने “देवाला नवस बोललो आहे”, अशी धार्मिक सबब सांगून तिला टाळाटाळ केली. सुरुवातीला श्रद्धेपोटी पत्नीने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, पण दिवसेंदिवस पतीचा दुरावा वाढतच गेला. अनेक दिवस उलटूनही पती जवळ येत नसल्याने पत्नीला संशय आला. तिने प्रेमाने समजावून सांगत पतीला वैद्यकीय उपचारांचा पर्यायही सुचवला. परंतु, गणेशने उपचारांना नकार दिला. आणि याच काळात आपल्या पतीचे “अमर” नावाच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध असल्याची धक्कादायक बाब पत्नीच्या समोर आली. ज्याच्या सोबत आयुष्याची स्वप्न रंगवली, ज्याच्यावर विश्वास ठेवून ती संसारात आली, तो पती मुळात एका पुरुषाच्या प्रेमात असल्याचे सत्य कळल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
आपल्या लैंगिक ओळखीचे भांड फुटल्याचे लक्षात येताच गणेशने बचावात्मक पवित्रा घेण्याऐवजी आक्रमक रूप धारण करत पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. स्वतःचे दोष लपवण्यासाठी त्याने पत्नीच्याच चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. त्याच्या या कृत्याला सासरच्या इतर मंडळींनीही त्याला साथ देत क्रूरतेची सीमा ओलांडली. सासू, जाऊ, दीर आणि नणंद यांनी विवाहितेची साथ देणे सोडून तिच्याकडे पैशासाठी तगादा लावला. “पतीकडून सुख हवे असेल, तर वडिलांकडून १५ लाख रुपये आणावे लागतील”, अशी अमानवीय अटच त्यांनी तिला घातली. विवाहितेने ही बाब माहेरच्या मंडळींच्या कानावर घातली.
पीडितेच्या भावाने बहिणीचा संसार वाचवण्यासाठी गणेश सोबत संवाद साधण्याचा,तसेच त्याला उपचारांसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गणेशने न जुमानता त्यालाही मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता पीडिता सोडून जाऊ नये, म्हणून आरोपींनी तिचे मौल्यवान दागिने आणि महत्वाचे शैक्षणिक कागदपत्रेही तिच्याकडून हिसकावून घेतले. ९ सप्टेंबर २०२५ रोजी आरोपी गणेशने तिला पुन्हा क्रूरपणे मारहाण केली.आता मात्र सहनशीलता संपलेल्या पीडितेने पोलिसांत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, गणेशच्या कुटुंबाने सामोपचाराने वाद मिटवण्याचे नाटक करून तिला शांत केले. काही दिवस लोटल्यानंतर पुन्हा तिला मारहाण केली, आणि तिला माहेरी नेऊन सोडले. सहनशक्तीचा अंत झाल्याने पीडितेने छावणी पोलिसांत धाव घेतली आणि आपबिती पोलिसांसमोर कथन केली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून तिचा पती गणेशसह सासरच्या १० जणांविरुद्ध छळ, मारहाण आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. समलैंगिक असताना आपली ओळख लपवून सामाजिक दबावापोटी लग्न करून गणेशने तरुणीच्या आयुष्याचा खेळ केला. पतीने आणि सासरच्या मंडळीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याकडे माहेरवरुन पैशे आणण्यासाठी तगादा लावला, ही बाब एका नव्या गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालणारी असून यातील आरोपींना वेळीच कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!