क्राईम जगत

मलकापुरात चाकूहल्ला: भंगार विक्रेत्यांमध्ये वाद विकोपाला

एकाची प्रकृती अत्यवस्थ;उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलविले

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): मलकापूर शहरातील वर्दळीच्या चारखांब चौक परिसरात आज दुपारी भंगार विक्रेत्यांमध्ये झालेल्या आर्थिक वादाचे रूपांतर रक्तरंजित लढाईपर्यंत जाऊन पोहोचले. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या या वादात चाकूने प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत मजल गेली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला की नाही?, असा प्रश्न कायदाप्रेमी उपस्थित करत आहेत.
खामगाव आणि मलकापूर येथील एकाच समाजातील दोन भंगार विक्रेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पैशांच्या व्यवहारावरून धुसफूस सुरू होती. दरम्यान, आज दुपारी मलकापूर शहरातील चारखांब चौक परिसरात हे दोन्ही गट आमनेसामने आले. सुरुवातीला शाब्दिक चकमक सुरू झाली. मात्र, काही वेळातच संताप अनावर झाल्याने भांडणात धारदार चाकूने भोसकून प्राणघातक हल्ला चढवण्यात आला. या जीवघेण्या हल्ल्यात दोन्ही बाजूचे दोन जण गंभीर जखमी झाले. चाकूने वार करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने एकाला शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले असून दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आल्याचे समजते. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे मलकापूर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
एवढी मोठी घटना घडूनही आणि दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असतानाही पोलिसांत या प्रकरणाची अद्यापपर्यंत कोणतीच नोंद करण्यात आलेली नाही, हे विशेष! भरदिवसा किरकोळ वादातूक चाकूहल्ल्यापर्यंत गेलेली मजल म्हणजे मलकापूर गुन्हेगारांच्या मनातून कायद्याचा धाक संपला तर नाही ना?, अशा शंका नागरिक उपस्थित करत आहे. त्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!